अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नवी पेठ परिसरात दोन गटांत झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. या घटनेत एका व्यक्तीचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा, तर दुसर्या गटातील तरूणाला लोखंडी फायटर व दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे. या घटनेप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादींवरून दोन स्वतंत्र गुन्हे शनिवारी (दि. 7) रात्री दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास नवीपेठ परिसरातील सुमारास राज एजन्सी व राणी कलेक्शनजवळ ही घटना घडली. याप्रकरणी जखमी अन्वर सय्यद (वय 50, रा. पंचपीर चावडी) यांनी दिलेल्या जबाबावरून नवाज उमर खान पठाण, शेख निसार इस्माईल, शेख अल्तमश निसार, मुसवीर सिकंदर पठाण आणि ओवेज निसार शेख (सर्व रा. पंचपीर चावडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अन्वर शेख यांच्या म्हणण्यानुसार, संशयित आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. दुचाकी आडवी लावून त्यांना खाली पाडले. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गळा दाबत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
यावेळी त्यांच्या गळ्यातील अंदाजे आठ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन काढून घेतल्याचा आरोप आहे. दरम्यान, याच घटनेच्या अनुषंगाने जखमी अल्तमश निसार शेख (वय 32, रा. पठाणवाडा, पंचपीर चावडी) याने दिलेल्या जबाबावरून अन्वर हुसेन शेख, नासीर हुसेन शेख, सय्यद मुन्नीर आणि मन्सूर सय्यद (सर्व रा. पंचपीर चावडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या फिर्यादीनुसार, अल्तमश कामावर जात असताना संशयित आरोपींपैकी एकाने मोपेडवर येऊन त्याला अडविले. न्यायालयात आमच्याविरुद्ध तक्रार का केली, असे विचारत शिवीगाळ केली. त्यानंतर खिशातील लोखंडी फायटर काढून वार केले.




