शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav
तालुक्यातील वरखेड येथे पैशाच्या व्यवहारावरून झालेल्या मारहाणीच्या घटनेतील जखमी ट्रॅक्टर चालकाचा उपचारादरम्यान अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयात 2 जानेवारीला मृत्यू झाला. भुजंग श्यामराव मडके (वय 40) असे मयताचे नाव आहे. त्याच्यावर वरखेड (ता. शेवगाव) येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेतील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी मयताची पत्नी योगिता भुजंग मडके (वय 34) यांनी 31 डिसेंबरला शेवगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, पती भुजंग हे 28 डिसेंबरला शेतामध्ये काम करीत होते. त्यावेळी महेश दत्तात्रय तेलोरे याने भुजंग यांना दुपारी दोन वाजता पगाराचे पैसे घेण्यासाठी फोन करून गावामध्ये बोलावून घेतले.
गावातील मंदिरासमोर भुजंग मडके महेश दत्तात्रय तेलोरे, दीपक महादेव तेलोरे, अमोल रावसाहेब उबाळे व इतर अज्ञात इसमांनी लाकडी काठीने पोटावर, छातीवर मारहाण करून जवर जखमी केले. गणेश रावसाहेब वंजारी यांनी भांडण सोडून पती भुजंग यांना घरी आणून सोडले. त्यानंतर त्यांना उलट्या होऊन त्रास झाल्याने शेवगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दुसर्या दिवशी प्रकृती खालावल्याने त्यांना अहिल्यानगर येथे उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्यावर तेथे उपचार सुरू असताना सहाव्या दिवशी 2 जानेवारीला पहाटे 4 च्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, या प्रकरणातील महेश व दीपक तेलोरे या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, अमोल उबाळे व इतर आरोपी पसार झाले आहेत.
पुढील तपास पोलिस निरीक्षक समाधान नागरे करीत आहे. पतीला जबर मारहाण केल्यानेच त्यांचा मृत्यू झाला असून, सर्व आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, तसेच फरार आरोपींना त्वरित अटक करावी, अशी मागणी योगिता मडके यांनी पोलिसांकडे केली आहे.