Monday, October 14, 2024
Homeनाशिकएकीकडे सुशोभीकरण तर दुसरीकडे विद्रुपीकरण

एकीकडे सुशोभीकरण तर दुसरीकडे विद्रुपीकरण

नविन नाशिक । प्रतिनिधी New Nashik

मुंबई आग्रा महामार्गावर उभारण्यात आलेल्या उड्डाणपूलाखाली एकीकडे गोविंदनगर भागात सुशोभिकरण करण्यात आले तर दुसरीकडे पाथर्डी फाटा परिसरात घाणीचे साम्राज्य आणि वाहनतळाची निर्मिती झाली आहे. या ठिकाणीसुद्धा सुशोभिकरण करणे आवश्यक आहे.

- Advertisement -

नाशिक शहरातून जाणार्‍या मुंबई महामार्गावर खत प्रकल्पापासून के.के. वाघ कॉलेजपर्यंत उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या उड्डाणपुलाखालून काही ठिकाणी वाहनांना जाण्याबरोबरच आता नव्याने पादचारी मार्ग निर्माण करण्यात आले आहेत.

त्याचबरोबर उड्डाणपुलाखाली असलेल्या काही भागात आता वाहनतळ होऊ लागले आहे. त्याचबरोबर गोविंदनगर पासून द्वारकापर्यंत उड्डाणपुलाखाली असलेली जागाही सुशोभित करण्यात आली.

नाशिक शहरात प्रवेश केल्यानंतर पाथर्डी फाटा चौकात मात्र ही परिस्थिती बर्‍याच अंशी विरुद्ध दिसून येते. पाथर्डी फाटा चौकात उड्डाणपुलाच्या खाली एका बाजूला वाहनतळ आणि शहर वाहतूक पोलीस कार्यालय झाले आहे. तर समोरच्या बाजूला पूर्णत: वाहनतळासह घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

शहरात किंवा इतरत्र ठिकाणाहून येणारे मुरुम किंवा वेगवेगळ्या प्रकारचे बांधकाम साहित्य या ठिकाणी सर्रासपणे टाकले जाते. त्याचप्रमाणे येथे काही ठिकाणी मोठमोठाले खड्डे खणून त्यातून मुरूम काढला जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अनेक नागरिकांनी या उड्डाणपुलाखाली रहिवास सुरू केला असून रात्रीच्या वेळात या ठिकाणी अनेक मद्यपी राहत असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे उड्डाणपुलाखाली एकीकडे सुशोभीकरण तर दुसरीकडे घाणीचे साम्राज्य असा प्रकार असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

या परिसरातून अनेक लोकप्रतिनिधींची ये-जा असतानाही त्यांच्या लक्षात हा प्रकार का येत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. उड्डाण पुलाखालचा संपूर्ण भाग लवकरात लवकर सुशोभित करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या