मलकापूर –
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन जिल्हा पोलिस अधीक्षक पदाचा एक दिवसीय सांकेतिक पदभार जिल्हा परिषद उर्दू हायस्कूलच्या 9 व्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनीने स्वीकारला. तिचे वडील मलकापुर येथे मोटर मॅकेनिक म्हणून गॅरेजवर काम करतात. ही अत्यंत हुशार विद्यार्थिनी असून भविष्यात तिला शिक्षक व्हायचे आहे, असे तिने सांगितले.
जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी दि.4 मार्च रोजी सहरिज कवल या विद्यार्थिनीला आपल्या पदाचा सांकेतिक पदभार देऊन सन्मान केला आहे. जिल्हा वासियांना एसपी नवीन महिला रुजू झाल्याची बातमी मिळाली तेव्हा शहरात चर्चा सुरु झाली होती.
जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात एक लाल दिव्याची गाडी येताच सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी सतर्क झाले व त्या गाडीचा दरवाजा शिपाई यांनी उघडला व त्या गाडीतुन एक शालेय विद्यार्थिनी उतरली आणि सर्व कर्मचार्यांनी मानवंदना दिली. त्यानंतर सर्व पोलिस अधिकारी यांचा परिचय पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी करुन दिला.
त्यानंतर नवीन पोलिस अधीक्षक कु.सहरिज केवल यांना त्यांच्या खुर्चीत विराजमान केले. दरम्यान काही भेटण्यासाठी व तक्रार देण्यासाठी जिल्ह्यातील नागरिक महिला, पुरुष आले होते. त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांना कारवाई करण्याचे आदेश सुद्धा त्यांनी यावेळी दिले.
यावरून नायक या चित्रपटाची आठवण झाली. एका दिवसाचा मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे जिल्हा पोलिस अधीक्षक एका मॅकेनिकची मुलगी व 9 व्या वर्गात शिकत असलेली विद्यार्थिनी सहरिज केवल यांच्या रूपाने एक दिवसाची जिल्हा पोलिस अधीक्षक पाहायला मिळाली.