पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
बीडमधील कुख्यात सतीश भोसले उर्फ ‘खोक्या’ याचे नाव वापरून पाथर्डीत खंडणी मागण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शेवगाव रस्त्यावरील 23 गुंठे जमिनीवर ताबा मिळवण्यासाठी जागा मालकाला तब्बल एक कोटी रूपयांची खंडणी मागण्यात आली. या प्रकरणी आजीनाथ सावळेराम खेडकर (वय 47 रा. चिंचपुर इजदे, ता. पाथर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत अरफान चव्हाण ऊर्फ गब्या, शिल्पा प्रशांत चव्हाण, सुनीता संजय भोसले, इंदुबाई आबाशा चव्हाण, शिल्पा अमोल काळे, संतोष आब्बास चव्हाण, काजल भाऊरस काळे, अनिता निस्तान काळे (सर्व रा. निपानी जळगाव, ता. पाथर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
शेवगाव रस्त्यावर 1 जानेवारी 2025 रोजी आजिनाथ सावळेराम खेडकर व विष्णु बाबासाहेब ढाकणे यांनी 23 गुंठे जमीन खरेदी केली होती. सातबारा उतार्यावर नोंद झाल्यानंतर जागेचा ताबा घेण्यासाठी तेथे पोहोचले असता, प्रशांत चव्हाण व त्याच्या साथीदारांनी त्यांना अडवले आणि एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. मी सतीश उर्फ खोक्या भोसले याचा साडू आहे. तुम्ही घेतलेल्या जमिनीवर ताबा मिळवायचा असेल, तर एक कोटी रुपये द्या. सुनिता संजय भोसले हिला 25 लाख रूपये द्यावे लागतील, असे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेची माहिती फिर्यादीने अर्जुन धायतडक व गहिनीनाथ शिरसाठ यांना दिली.
त्यानंतर अर्जुन धायतडक यांनी प्रशांत चव्हाणला समजावून सांगण्यासाठी फोन केला असता, त्याने पुन्हा एक कोटी रुपयांची मागणी केली आणि जर पैसे दिले नाहीत, तर तुमच्यावर विनयभंग, बलात्कार आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. बीडमध्ये खोक्याच्या खंडणीचा धसका असतानाच, त्याचे लोण आता पाथर्डीतही पोहोचले आहे. खंडणीच्या या प्रकरणामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात मोठे रणकंदन होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव गुट्टे करत आहेत.