Wednesday, October 16, 2024
Homeनगरबीड मार्गावर दोन अपघातात 9 ठार

बीड मार्गावर दोन अपघातात 9 ठार

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

मुंबईहून नगर मार्गे बीडला निघालेल्या ट्रॅव्हल्सबसचा जामखेडपासून सहा किमी अंतरावर आष्टा गांधनवाडी फाट्याजवळ चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असून 23 जण जखमी झाले आहेत. तर दुसरा अपघात बीड- कल्याण महार्गावर रुग्णवाहिकेत रुग्णांना धामणगाववरून नगर येथे उपचारासाठी घेऊन जाणार्‍या रुग्णवाहिकेला ट्रकने दिलेल्या धडकेत डॉक्टरासहित 4 जण ठार झाल्याची घटना घडली. जामखेड परिसरात दोन वेगवेगळ्या अपघातांत 9 जणांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

ट्रॅव्हल्स बसच्या अपघातात धोंडीबा शिंदे (36, रा. भिल्लारवाडी, ता. शिरूर जि. बीड), देविदास पेचे (रा. सौताडा ता. पाटोदा ), अशोक भोंडवे (रा. पिट्टी नायगाव, ता.पाटोदा,), महंमद दोस्त महंमद खान (रा.कुर्ला), रवी गोंडवे (28, रा. डीग्रस ता.पुसद जि.यवतमाळ) यांचा मृत्यू झाला आहे. मुंबईहून बीडकडे सागर ट्रॅव्हल्सची बस (क्र. एनएल. 1 बी.2499) ही 45 ते 50 प्रवासी घेऊन जात होती. गुरूवारी पहाटे आष्टा गांधनवाडी फाट्याजवळ वळण घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पल्टी झाली. अपघात एवढा भीषण होता की ट्रॅव्हल बस सुमारे 100 ते 150 फूट घसरत गेली. यात 23 जण जखमी झाले आहेत. त्यांना आष्टी व जामखेड येथे जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.

गंभीर प्रवाशांना नगरला येथे हलविण्यात आले आहे तर दुसर्‍या घटनेत रुग्णवाहिकेतील डॉ.राजेश झिंजुर्के (38, रा. सांगवीपाटण, जि. बीड), रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर भरत लोखंडे (रा. धामणगाव, ता.आष्टी), रुग्ण मनोज पांगु तिरपुडे व पप्पु पांगु तिरखुंडे (दोघे रा.जाटदेवळा, ता.आष्टी) अशा चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. एका जखमीवर उपचार सुरू आहेत. या रुग्णवाहिकेमध्ये एकूण पाच जण होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका रुग्णास उपचारासाठी तातडीने घेऊन नगरकडे जाणार्‍या रुगणवाहिकेने (क्र.एमएच.16 क्यू.9507) मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास आष्टी तालुक्यातील दौलावडगाव शिवारात दत्त मंदिराजवळ पुढे चाललेल्या ट्रकला (क्र. एमएच.21 एक्स 8600) व्यंकटेश कंपनीकडे डाव्या बाजूने वळण घेत असताना ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात 4 ठार तर 1 गंभीर जखमी झाला आहे.

आमदार सुरेश धसांची घटनास्थळी धाव…

अपघाताची माहिती कळताच आष्टीचे आ. सुरेश धस यांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने फोन फिरवत अपघातस्थळी मदतीसाठी जवळच्या गावातील नागरिकांना बोलावून घेतले. रुग्णाहिका बोलावून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात तसेच संबंधित आरोग्य यंत्रणांशी संपर्क करून जखमींच्या उपचारांसाठी मोठी मदत केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या