बीड | Beed
बीडमधील (Beed) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणात (Murder Case) बीडच्या जिल्हा कारागृहात असलेल्या वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. कारागृहातील कैद्यांच्या दोन गटांमध्ये वाद झाल्याची माहिती असून आज सकाळच्या सुमारास हा राडा झाल्याचे बोलले जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्हा कारागृहात (Beed District Jail) आज सकाळच्या वेळी बबन गीते (Baban Gite) यांचे समर्थक कैदी आणि परळीतील विरोधी गटातील कैदी एकमेकांना भिडले. यातील मकोका कायद्याअंतर्गत शिक्षा भोगत असलेला अक्षय आठवले नावाचा आरोपी व महादेव गीते हा आरोपी कराड आणि घुले यांच्या अंगावर धावून गेल्याची माहिती समोर येत आहे.
तसेच या हल्ल्याबाबत (Attack) जेल प्रशासनाने अद्याप दुजोरा दिलेला नाही. या चौघांमध्ये सुरूवातीला बाचाबाची झाली. त्यानंतर या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले अशी माहिती समोर येत आहे. दोन गटातील दोन्ही आरोपी यापूर्वी देखील आमनेसामने आले होते.
दरम्यान, कारागृह प्रशासनाने (Prison Administration) या संपूर्ण घटनेचा तपास सुरू केला असून कारागृहातील सुरक्षाव्यवस्था अधिक कडेकोट करण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत. यापूर्वीही तुरुंगात अशा प्रकारच्या घटना घडल्या असल्याने सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.