Friday, May 3, 2024
Homeनगरगोमांस घेऊन जाणारी स्वीप्ट कार ट्रॅक्टर ट्रॅालीवर आदळली

गोमांस घेऊन जाणारी स्वीप्ट कार ट्रॅक्टर ट्रॅालीवर आदळली

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

गोवंश जातीच्या जनावरांच्या मांसाची वाहतूक करणारी स्विफ्ट डिझायर कार ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर आदळल्याने तीन जण जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास तालुक्यातील निमोण परिसरात घडली. ही कार श्रीरामपूर येथून मुंबईकडे जात होती दरम्यान हा अपघात घडला. याप्रकरणी तिघांविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

मुन्ना असलम सय्यद (वय 24, रा. वॉर्ड नंबर 2, श्रीरामपूर), सलमान इरफान शेख (वय 24, रा. वॉर्ड नंबर 2, श्रीरामपूर), एजाज कुरेशी (रा. वॉर्ड नंबर 2, श्रीरामपूर) अशी आरोपींची नावे आहेत. हे तिघे जण त्यांच्या ताब्यातील स्वीप्ट कार क्रमांक एम. एच. 15 सी. एम. 3688 मधून गोवंश जनावरांचे मांस घेऊन श्रीरामपूर येथून निघाले होते. दरम्यान निमोण परिसरातील लोणी ते नांदूरशिंगोटे शिवारातून भरधाव वेगाने जात असलेल्या स्वीप्ट कारने समोर चाललेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोराची धडक दिली.

या धडकेत कारमधील दोघे किरकोळ जखमी झाले तर वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. तर ट्रॅक्टर ट्रॅालीमधील एक जखमी आहे. अपघाताची घटना घडल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. कारमधील जखमी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना ग्रामस्थांनी त्यांना पकडून ठेवले. वाहनामधील गोवंश जनावरांचे मांस वाहनाबाहेर फेकले गेले होते. अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, तालुका पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. जखमींना लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी घटनास्थळाहून 3 लाख रुपये किमतीची स्वीप्ट कार व 1 लाख रुपये किमतीचे 500 किलो गोवंश जनावरांचे मांस असा 4 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबच पोलीस नाईक अनिल जाधव यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी वरील तिघांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 408/2022 भारतीय दंड संहिता 269, 429, 34, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे 5(क), 9 (अ) प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार ए. आर. पठाण करत आहेत.

श्रीरामपूरसह संगमनेरमधून बेकादेशीर कत्तलखान्यामधून तयार झालेले गोवंश जनावरांचे मांस मुंबईला पाठवण्यात येते. बाहेरील तालुक्यातील गोमांसही आता संगमनेर तालुक्यातून मुंबईकडे नेले जाते. या वाहतुकीकडे संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. तालुका पोलिस हद्दीत नाकेबंदी करण्यात येत नाही. तालुका पोलिसांकडून कोणत्याही वाहनाची तपासणी केली जात नाही. तालुका पोलीस ठाण्याचा हद्दीतील गावातून खुलेआम गोमांसाची वाहतूक होत असताना पोलिसांचे मात्र दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.

या वाहतुकीला तालुका पोलिसांचा आशिर्वाद तर नाही ना अशी चर्चा आता सुरू झाली आहे. गोमांस विक्रेते गाडीच्या काचा काळ्या करून गोमांस वाहतूक करत असतात. याकडे कोणत्याही पोलीस अधिकार्‍यांचे का लक्ष नाही? तालुका पोलिसांचे आणि श्रीरामपूरच्या कत्तलखान्याचे काही साटेलोटे तर नाही? अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी याकडे लक्ष द्यावे ,अशी मागणी आता ग्रामस्थ करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या