अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या पथकाने मुकुंदनगर भागात गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करणार्या इसमांवर कारवाई केली. एक लाख 41 हजार 500 रुपये किमतीचे 700 किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे.
भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मूलगीर यांना माहिती मिळाली की, मुकुंदनगर येथील वाबळे कॉलनी शेजारील पार्किंगच्या पत्र्याच्या शेडमध्ये एक इसम गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सहायक निरीक्षक मूलगीर यांनी तपास पथकातील अधिकार्यांना तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस पथकाने नमूद ठिकाणी छापा टाकला असता, सलोम मुसा शेख (रा. कोठला, घासगल्ली, अहिल्यानगर) हा गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करताना आढळला.
त्याच्याकडे चौकशी केली असता, सदर गोमांस तोसिफ कुरेशी व इर्शाद कुरेशी (रा. नालबंद खुंट, मस्जिदमागे, अहिल्यानगर) यांचे असल्याचे सांगितले. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, पोलीस अंमलदार अजय गव्हाणे, पांडुरंग बारगजे, दिलीप झरेकर, इस्माईल पठाण, समीर शेख, प्रमोद लहारे यांनी ही कारवाई केली आहे.