Sunday, June 14, 2026
Homeक्राईमSangamner : बिअर बार फोडणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

Sangamner : बिअर बार फोडणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई || साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळवाडी येथील हॉटेल निलायम बार फोडून चोरी करणारी आंतरराज्यीय टोळीला गजाआड करण्यात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पथकाने आरोपींकडून 5 लाख 55 हजार 160 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत पाच गुन्ह्यांची उकल देखील केली आहे.

- Advertisement -

किशोर बाळाजी डोके (रा. खंदरमाळवाडी) यांचे हॉटेल निलायम बार अज्ञात चोरट्यांनी तोडून विविध कंपन्यांची 3 लाख 6 हजार 190 रुपये किमतीची विदेशी दारु, सिगारेट व सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा डीव्हीआर चोरुन नेल्याप्रकरणी घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, विजय पवार, फुरकान शेख, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डिले, अमृत आढाव, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत, चालक महादेव भांड यांचे पथक तयार करुन गुन्हा उघडकीस आणण्याकामी रवाना केले. पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदर गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असताना हा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी हसन हमजा कुट्टी (रा. नाशिक) याने त्याच्या साथीदारासह केला असून तो साथीदारांसह नाशिक येथे असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी गेले असता हसन हमजा कुट्टी (रा. नवनाथनगर, शेवाडी, पंचवटी नाशिक), आकाश सचिन सूर्यवंशी (रा. दत्त चौक, कालिका माता मंदिराजवळ सिडको, नाशिक), मेहताब गुलाम रसुल अन्सारी (मूळ रा. नुरीनगर, कटहार तांडा, ता. निम्मेगड, जि. गिरटी, झारखंड) असे मिळून आले. त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांनी साथीदार बंटी दास (पूर्ण नाव माहित नाही, रा. झारखंड, फरार) याच्यासह केल्याची कबुली दिली. तसेच मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता पळसे (ता. जि. नाशिक) येथील हॉटेल लकी बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंटचे चालक किरण रामदास उगले व विवेक अरुण उगले यांना चोरीचा माल असल्याचे सांगून विक्री केला असल्याचे आणि विवेक उगले याने चोरी करण्यासाठी वाहन उपलब्ध करुन दिल्याचे सांगितले.

यातील किरण उगले (रा. सामनेर ता. इगतपुरी, जि. नाशिक, हल्ली रा. लकी बार रेस्टॉरंट पळसे, नाशिक) हा मिळून आला आहे. त्याच्याकडून 4 लाख 5 हजार 160 रुपये किमतीची वेगवेगळ्या कंपन्यांची विदेशी दारु, 1 लाख 50 हजार रुपये किमतीची कार (क्र. एमएच.48, एफ.0723), कटर, मंकी मास्क, एअर पिस्टल, स्क्रू डायव्हर असा एकूण 5 लाख 55 हजार 160 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याच आरोपींनी संगमनेर तालुका पोलीस ठाणे हद्दीत दोन, वावी (जि.नाशिक) पोलीस ठाणे हद्दीत एक आणि पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) पोलीस ठाणे हद्दीत एक असे चार गुन्हे केले असल्याचे उघड झाले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास घारगाव पोलीस करीत आहे.

ताज्या बातम्या

शेत रस्त्याच्या वादातून तरुणास मारहाण

0
मानूर | वार्ताहर Manur कळवण तालुयातील भादवण शिवारात शेतजमिनीच्या वहिवाट रस्ता वादातून एका तरुणासह त्याच्या वडिलांना मारहाण केली. यामुळे मारहाण झालेल्या युवकाने विष घेत आत्महत्या...