मुंबई । Mumbai
ट्रेकिंगसाठी कर्नाळा किल्ल्यावर गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी अचानक हल्ला केला. या घटनेत 9 जण जखमी झाले असून, संदीप पुरोहित (वय 40) यांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी हा प्रकार घडला.
माटुंगा, मुंबईतील व्हीजेटीआय महाविद्यालयाचे 6 विद्यार्थी आणि अन्य पर्यटक मिळून 40-50 जण कर्नाळा किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेले होते. मोठ्या आवाजामुळे मधमाशा चवताळल्या आणि त्यांनी हल्ला केला. अचानक हल्ल्यामुळे अनेकांनी पळापळ केली. काही जण खाली उतरू लागले, तर काही अजून किल्ल्याकडे जात होते.
या हल्ल्यात 9 जण गंभीर जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक होती. उपचारादरम्यान संदीप पुरोहित यांचा मृत्यू झाला. एका विद्यार्थ्याच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली आहे.
पर्यटकांनी तातडीने 108 नंबरवर मदत मागितल्याने रुग्णवाहिका वेळेत घटनास्थळी पोहोचली. व्हीजेटीआय महाविद्यालयातील सहाही विद्यार्थी सुरक्षित असून त्यांच्यावर पनवेल उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.