अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या चार भिक्षेकरुंचा उपचार सुरू असताना झालेल्या मृत्यूनंतर शिर्डीतील भिक्षेकरुंचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयाने सावध भूमिका घेतली असून शवविच्छेदन अहवालाबाबत गुप्तता बाळगली आहे. नाशिकचे आरोग्य उपसंचालक यांना आज शुक्रवारी शवविच्छेदन अहवाल सादर केला जाणार आहे, तर चौकशी समितीचा अहवाल सोमवारी रुग्णालयास प्राप्त होणार आहे.
शिर्डी पोलीस, नगर परिषद आणि साईसंस्थान यांनी शहरातील भिक्षेकरुंच्या धरपकडीत 49 जणांना श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर केंद्रात दाखल केले होते. यातील दहा जणांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना 6 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. यातील चारजणांचा 7 आणि 8 एप्रिल रोजी मृत्यू झाला होता. यानंतर दोन रुग्णांच्या नातेवाईकांनी भिक्षेकरी नसतानाही विसापूर केंद्रात बळजबरीने दाखल केले, तसेच जिल्हा रुग्णालय व विसापूर येथील भिक्षा स्वीकार केंद्रावर हालगर्जीपणा झाल्याचा आरोप केला होता. नातेवाईकांनी या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यानंतर बुधवारी खासदार नीलेश लंके यांनी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तीन रुग्णांची भेट घेत माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर टीका केली होती. तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या घटनेला राजकीय वळण लागल्याने प्रशासनाने सावध भूमिका घेतली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात आपला बळी जाऊ नये, यासाठी चारही मृतांच्या शवविच्छेदन अहवालाबाबत जिल्हा रुग्णालाकडून गुप्तता बाळगण्यात आली आहे.
खा.लंकेकडून सीसीटीव्ही फुटेजची मागणी
दरम्यान, जिल्हा रुग्णालयात घडलेल्या प्रकाराची चौकशी व्हावी, दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी खा. नीलेश लंके यांनी रुग्णालय प्रशासानकडे भिक्षेकरून ठेवण्यात आलेल्या वार्डचे सीसी टीव्ही फुटेजची मागणी केलेली आहे. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांना खा. लंके यांच्यावतीने पत्र देण्यात आले आहे.