Saturday, September 26, 2026
Homeक्राईमShrirampur : बेलापूर येथे तीन डीजे मालकांवर गुन्हे दाखल

Shrirampur : बेलापूर येथे तीन डीजे मालकांवर गुन्हे दाखल

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथे गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत नियम धाब्यावर ठेऊन नागरिकांना त्रास होईल अशा कर्णकर्कश आवाजात लेजर लाईटच्या वापरासह गाणी वाजविणार्‍या नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील तीन डीजे बँड व चालकांना ताब्यात घेऊन तसेच डीजे मालकांच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 36/134 अन्वये वरिष्ठ अधिकार्‍यांच्या निर्देशानुसार श्रीरामपूर शहर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

याबाबतची माहिती अशी की, या डीजेचा उच्छाद नागरिकांना असह्य झाल्याने डायल 112 क्रमांकावर तक्रार करण्यात आली. त्यानंतर पोलीस अधिकार्‍यांनी तात्काळ गावात जाऊन खात्री केली असता त्यांना तक्रारीत तथ्य आढळून आल्यावर त्यांनी डीजे बँड बंद करुन वाहन चालक ज्ञानेश्वर भिमा सोनवणे (रा. घोडेगाव, जि. जळगाव), राहुल रेवजी गांगुर्डे (रा.सुतारखेडे ता.चांदवड) आणि सुनील भिवा अहिरे (रा.कजवाडे, ता. मालेगाव, जि.नाशिक) यांना वाहन बँडसह ताब्यात घेतले.

दरम्यान गावातील गणेश मंडळाच्या अतीउत्साही अडीचशे ते तीनशे कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थानी आपले कोणीच काही बिघडवू शकत नाही, आपली वरपर्यंत पोहोच आहे, अशा अविर्भावात या कारवाईला पोलिसांना चक्क विरोध केला.त्यावर पोलीस अधिकार्‍यांनी त्या सर्वांना बेलापूर दूरक्षेत्र येथे आणुन त्यांना कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या आणि तीनही डीजे चालकांच्या विरुद्ध कारवाई केली आहे.तसेच डीजे मालक वैभव गांगुर्डे, विठोबा कापडणीस आणि संतोष धुमाळ यांच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 36/134 अन्वये श्रीरामपूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारंपारिक वाद्यांची परंपरा मोडीत
बेलापूरची उत्सव आणि संस्कृतीप्रिय गाव अशी ओळख आहे. सर्व उत्सव येथे ढोल-ताशा, डफ, लेझीम, बँड, डोलीबाजा, सनई, चौघडा अशा वाद्याचा वापर करुन पार पडत असतात. मात्र न्यायालयीन निर्बंध धाब्यावर बसवून नागरिकांना विशेषत: आजारी, वृद्ध नागरिकांना त्रासदायी ठरणार्‍या या डीजे वापराबद्दल नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. डायल 112 वर तक्रार झाल्यावर ही कारवाई करण्यात आली. तोवर हा प्रकार स्थानिक पोलिसांच्या कसा लक्षात आला नाही? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ताज्या बातम्या