Friday, September 18, 2026
HomeनगरShrirampur : कुत्र्याच्या चाव्यामुळे दहाजण जखमी; सात जणांना नगरला हलविले

Shrirampur : कुत्र्याच्या चाव्यामुळे दहाजण जखमी; सात जणांना नगरला हलविले

बेलापूर | Belapur

गावात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून काल गावात एका कुत्र्याने चावा घेतल्याने दहाजण जखमी झाले असून सात जखमींना नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रवाना केले आहे. त्यातील सत्तर वर्षीय वृद्ध महिला नैमूदा निसार शेख यांना तोंडावर गंभीर जखमा झाल्या आहे.स्थानिक प्रशासनाने या उपद्रवी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

- Advertisement -

या संदर्भातील माहिती अशी की, बर्‍याच दिवसांपासून गावात बाहेरून वाहनाने भरुन कुत्रे आणुन सोडले जात असल्याने गावात कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. काल तर एका कुत्र्याने गावातील दहा अबालवृद्धाना चावा घेऊन कहरच केला. त्यात गावातील साई मगर, मतीन काझी, सागर जोशी या बालकांसह सविता साबळे, सागर शिंदे हे तरुण आणि नैमूदा शेख आणि शारदा रेनिवाल या महिलांसह अन्य दोघांना चावे घेऊन अक्षरशः काहींचे लचके तोडले आहेत.या सात जखमीना पुढील उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेने नगर येथील सिव्हिल रुग्णालयात पाठविले आहे. तर अन्य जखमीवर स्थानिक पातळीवर उपचार करुन सोडून देण्यात आले.वैद्यकीय अधिकारी डॉ.आश्विनी लिप्टे, डॉ.शैलेश पवार यांनी जखमीवर उपचार केले. याकामी सिस्टर ग्रेटा कदम, गणेश टाकसाळ, संतोष शेलार, रोहन कडू, माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी मदतकार्य केले.

अनेकांना चावा घेऊन जखमी करणारे कुत्रे पिसाळलेले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासह गाव परिसरातील मोकाट तसेच नागरिकांना उपद्रव करणार्‍या खाजगी कुत्र्यांचाही स्थानिक प्रशासनाने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून पुढे येत आहे.याबाबत विशेषतः शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी,वृद्ध नागरिक तसेच ग्रामस्थानी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्थानिक प्रशासनाच्या पुढाकाराची गरज
सणासुदीच्या काळात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने नागरिक बाहेर पडतात. त्यात अशा घटना घडत असल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.अशा स्थितीत घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी न्यायालयीन मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करुन स्थानिक प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करुन नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : जोपूळ आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्याचे आदेश

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik आश्रमशाळांमधील असुविधांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी गुरुवारी (दि.१७) सायंकाळी दिंडोरी तालुक्यातील जोपूळ येथील...