Wednesday, June 26, 2024
Homeनगरबेलापूर ग्रामपंचायतमध्ये 1 कोटी 95 लाखांचा गैरव्यवहार

बेलापूर ग्रामपंचायतमध्ये 1 कोटी 95 लाखांचा गैरव्यवहार

दोन ग्रामसेवक निलंबित || तत्कालीन सरपंचावरील कारवाईसाठी आयुक्तांकडे प्रस्ताव

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

- Advertisement -

तालुक्यातील बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये 1 कोटी 95 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे. या अहवालावरून आजी-माजी ग्रामसेवक मेघशाम गायकवाड व राजेश तगरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून माजी सरपंच महेंद्र साळवी यांच्यावर कारवाईसाठी आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

बेलापूर ग्रामपंचायतमध्ये काही महिन्यांपूर्वी सरपंच महेंद्र साळवी यांचे राजीनामानाट्य चांगलेच रंगले होते. तत्कालीन सरपंच महेंद्र साळवी व ग्रामसेवक राजेश तगरे यांच्या कार्यकाळातील चौकशीची मागणी सत्ताधारी 9 ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री अभिषेक खंडागळे, मुश्ताक शेख, चंद्रकांत नवले, तब्बसूम बागवान, उज्ज्वला कुताळ, सविता अमोलिक, मीना साळवी, वैभव कुर्‍हे, प्रियंका कुर्‍हे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानुसार याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्यामध्ये जामखेड, शेवगाव, कर्जत येथील विस्तार अधिकारी यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती.

ग्रामपंचायतीच्या दप्तराची 1 एप्रिल 2022 ते 11 नोव्हेंबर 2023 या कालावधीची या समितीमार्फत चौकशी करण्यात आली. त्याचा अहवाल दि. 28 नोव्हेंबर 2023 रोजी देण्यात आला. त्यात ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व गैरव्यवहार झालेला असल्याचे मत चौकशी अधिकारी यांनी नोंदविले आहे. प्रमाणकाशिवाय ग्रामनिधीमधून 26 लाख 99 हजार 714 रुपये काढले, जीईएम पोर्टलद्वारे साहित्य खरेदी करणे आवश्यक असताना ती केली नाही, मात्र यापोटी 89 लाख 22 हजार 911 रुपये खर्च, विकास कामांच्या निविदा प्रसिद्ध न केल्यामुळे शासनाचा महसूल बुडाला, बेलापूर बुद्रुक येथील 15 व्या वित्त आयोग योजनेअंतर्गत 2021-22 व 2022-23 मधील एकत्रित काम पाण्याची टाकी बांधकाम करणे (73 लाख 63 हजार 464 रुपये) या कामाच्या ई निविदा प्रक्रियेबाबत सरपंच व ग्रामसेवक यांनी निविदा प्रणालीसाठी वापरण्यात येणारी डीएससी कीट तपासासाठी उपलब्ध करून न दिल्याने ऑनलाईन तपासणी करता आली नाही.

ग्रामपंचायतीने वेगवेगळ्या विकास कामांवर 70 लाख 27 हजार 357 रुपये खर्च, पैकी 23 लाख 31 हजार 658 रुपये या शासकीय रकमेची साहित्य व विकास कामे न करता रक्कम परस्पर सरपंच व तत्कालीन ग्रामसेवकाने संगनमताने कायम काढून घेतले. उर्वरित 46 लाख 95 हजार 699 रुपये या रक्कमेच्या कामाची अंदाजपत्रके निविदा व मूल्यांकने, कामाची ठिकाणे तपासणी कामी उपलब्ध न झाल्याने सदरची रक्कम संशयित अपहार केल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायतीकडे डिझेल वाहन असताना एक लाख 43 हजार 806 रुपयांचे पेट्रोल खरेदी केले. तसेच ग्रामपंचायतीसाठी सहा लाख 74 हजार 25 रुपयांचे खरेदी केलेले डिझेल कोणत्या वाहनासाठी वापरले याचे लॉग बुक उपलब्ध नाही. यांसह अनेक मुद्यांवर अहवालातून प्रकाश टाकण्यात आला आहे.

विविध प्रकारच्या चौकशीतून तत्कालीन सरपंच महेंद्र साळवी व तत्कालीन ग्रामसेवक राजेश तगरे यांच्याकडून एकूण 1 कोटी 94 लाख 67 हजार 813 रुपये कायमस्वरूपी व संक्षिप वसूल पात्र असल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे.
बेलापूर बुद्रुक येथे 15 व्या वित्त आयोगातून पाणीची उंच टाकी बांधणे हे काम आराखड्यात मंजूर आहे. हे काम एक कोटी पाच लाख 69 हजार 658 रुपयांचे असताना जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी मान्यता दिली. परंतू, इतक्या रकमेच्या कामास तांत्रिक मंजूर देण्याचा अधिकार जिल्हा परिषदेला नसतानाही तो नियमबाह्य देऊन अनियमितता केल्याचा अभिप्राय अहवालात देण्यात आल्याने सदर अधिकारीही चौकशीच्या फेर्‍यात येण्याची शक्यता आहे.

सत्ताधारी सदस्यांनी तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून सरपंचानी राजीनामा दिल्यानंतर ते थांबेल असे वाटत असताना दोन ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई झाली तर माजी सरपंच महेंद्र साळवी यांच्यावर कारवाईसाठी प्रस्ताव आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये कोणताही ग्रामसेवक हजर होण्यास तयार नाही. झालेल्या खर्चाला मंजूरी मासिक मिटींगमध्ये देण्यात आली असून सूचक व अनुमोदन सत्ताधारी गटाच्या सदस्यांनी दिलेले आहे. चुकीच्या पध्दतीने खर्च दाखविला असल्याने झालेला बेकायदेशीर खर्च आहे, तो त्यांच्याकडून वसुल करण्यात यावा, अशी तक्रार माजी सरपंच भरत साळुंके, रविंद्र खटोड, रमेश अमोलिक, रंजनाताई बोरूडे, शिलाताई पोळ, छायाताई निंबाळकर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

मी नाही त्यातली…
‘मी नाही त्यातली व कडी लाव आतली’ असे स्वतःला गावाचे पुढारी व नेते म्हणून घेणारे गावपुढारी (ठेकेदार) यांच्या आशिर्वादाने वरील गैरव्यवहार झालेला आहे. स्वतः गैरव्यवहार करायचा व आपला वाटा कमी झाल्यानंतर स्वत:च्या बगल बच्च्यांकडून तक्रार करायची व स्वतःची सही नसल्याने दुसर्‍याच्या माथी खापर फोडून आपण ‘साव’ असल्याचा आव आणायचा.
-सुधीर नवले, सभापती बाजार समिती

- Advertisment -

ताज्या बातम्या