श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या बेलापूर बुद्रुकचे सरपंच महेंद्र साळवी यांनी काल गावकरी मंडळाचे नेते शरद नवले यांच्यावर दबावतंत्र आणि मनमानीचा ठपका ठेऊन गावकरी मंडळाला सोडचिठ्ठी देत काँग्रेस व भाजपा प्रणित जनता विकास आघाडीत प्रवेश करुन स्थानिक राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडविला. त्यामुळे ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले आहे.
यावेळी साळवी यांनी सांगितले की, मी मागासवर्गीय असल्याने माझ्यावर माजी जि. प. सदस्य शरद नवले व उपसरपंच, बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी सतत या ना त्या कारणाने दबाव आणून मला ग्रामविकासाची कामे करण्यापासून हेतूपूर्वक रोखले. अशा स्थितीत मानसिक दडपणाखाली आपण काम करु शकत नव्हतो. तसेच जनतेशी असलेली जबाबदारीची बांधिलकीही नाकारू शकत नव्हतो. त्यामुळे आपण येथून पुढील राजकीय वाटचाल जनता विकास आघाडीसोबत करुन गावाचा विकास करण्याचा निर्णय घेत आहोत.
यावेळी श्रीरामपूर बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, माजी सरपंच भरत साळुंके, जनता आघाडीचे अध्यक्ष रविंद्र खटोड, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अरुण पाटील नाईक आदींनी साळवी यांच्या भूमिकेचे स्वागत करुन यापुढे ग्रामविकास साधण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही दिली.
यावेळी सर्वश्री ग्रा. पं. सदस्य रमेश अमोलिक, विलासराव मेहेत्रे, शिवाजी वाबळे, अशोक कारखाना संचालक भगवान सोनवणे, गोरक्षनाथ कुर्हे, बेलापूर कॉलेजचे चेअरमन राजेश खटोड, ज्ञानदेव वाबळे, माजी उपसभापती दत्ता कुर्हे, राम पोळ, नंदकिशोर नवले, अशोक गवते, जिजामाता पतसंस्थेचे चेअरमन शेषराव पवार, अहिल्यादेवी पतसंस्थेचे चेअरमन अशोक राशीनकर, ऐनतपूर सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत नाईक, अभिजित राका, विजय शेलार, बंटी शेलार, एस. के. कुर्हे, जाकीर शेख, संजय शेलार, प्रकाश जाजु, सावकार ताम्हाणे, अशोक मगर, अनिल नवले, सतीश सोनवणे, बद्रीनारायण शर्मा, महेश नवले, जालिंदर गाढे, बाळु लगे आदी उपस्थित होते.
तोवर चर्चा तर होणारच…
गेल्या दोन तीन महिन्यांपासून यासंबंधी दोन्हीही बाजूने मोठ्या प्रमाणावर गुप्त बैठका व राजकीय हालचाली सुरू होत्या. त्यामुळे येत्या काळात काहीतरी मोठा राजकीय भूकंप घडेल, याची चाहूल लागून होती.अखेर काल सरपंच महेंद्र साळवी यांनी आपला निर्णय जाहीर करुन सर्वांनाच राजकीय धक्का दिला. अलिकडे घडत असलेल्या घडामोडी आणि राजकीय पार्श्वभूमीवर असे काही घडणे अपेक्षितच होते, असे अनेकांनी सांगितले. दरम्यान सरपंच साळवी यांच्या समवेत आणखी किती सदस्य आहेत? तसेच पुढील रणनिती काय असेल? याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.