Tuesday, January 27, 2026
Homeनगरबेलापूरच्या ग्रामसभेत आरोप-प्रत्यारोप, बाचाबाची आणि खडाजंगी

बेलापूरच्या ग्रामसभेत आरोप-प्रत्यारोप, बाचाबाची आणि खडाजंगी

घरकुलासाठी पैसे मागितले जात असल्याचा आरोप || पोलीस बंदोबस्तात पाच तास चालली सभा

बेलापूर |वार्ताहर| Belapur

घरकुल लाभार्थ्यांना एक गुंठा जागा नावावर करून द्या, या मागणीवरून बेलापूरच्या ग्रामसभेत प्रचंड गदारोळ झाला. तू..तू.., मैंं..मैं.. वरून सुरू झालेला गदारोळ हमरी-तुमरी आणि माईक ओढा ओढीपर्यंत गेला. ग्रामसभेत गोंधळ होताच पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागविली. पाच तास चाललेला ग्रामसभेचा वाद अखेर सामाजिक व राजकीय नेते सुनील मुथा यांच्या मध्यस्थीनंतर मिटला.

- Advertisement -

स्वातंत्र्यदिनी घेतली जाणारी ग्रामसभा काल बेलापूर ग्रामपंचायतीच्या आवारात सरपंच मीनाताई साळवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे यांनी अहवाल वाचन केले. त्यानंतर जलजीवन पाणीपुरवठा योजनेचा विषय निघाल्यावर या ग्रामसभेस जलजीवन पाणीपुरवठा करणार्‍या योजनेचे अधिकारी आणि ठेकेदार का उपस्थित नाहीत? असा सवाल माजी सरपंच भरत साळुंके, चंद्रकांत नाईक आणि बाजार समितीचे सभापती सुधीर नवले यांनी केला. जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे पाईप रस्त्याच्या मधोमध टाकून नळ जोडणी देण्यात आल्यामुळे भविष्यात नळ कनेक्शन गळती झाल्यास पुन्हा पक्के रस्ते खोदावे लागणार असल्याचा मुद्दा श्रीण साळुंके व श्री. नवले यांनी उपस्थित केला.

YouTube video player

यावेळी अभिषेक खंडागळे यांनी लवकरच ग्रामसभा घेऊन ग्रामस्थ, अधिकारी, पत्रकार आणि गावातील सुज्ञ नागरिक यांना बरोबर घेऊन आपण पाहणी दौरा करू आणि काही त्रुटी राहणार नाही. याची दक्षता घेऊ असे सांगितले. तळ्याचा व नळ कनेक्शन जोडणीचा ठेका कोणाला दिला? काम कोण करते? अशी विचारणा चंद्रकांत नाईक यांनी केली. अभिषेक खंडागळे यांनी सांगितले की, लवकरात लवकर बैठक बोलावली जाईल तसेच जे अनाधिकृत नळ जोडणी असेल, ती पैसे भरून घेऊन अधिकृत करण्यात येईल.

बालविवाह थांबविण्यात यावा, बालविवाह मुक्त गाव करण्यात यावा, असा विषय ग्रामविकास अधिकारी लहारे यांनी मांडला. यानंतर वृक्षारोपणाचा विषय निघाला असता देविदास देसाई यांनी सांगितले की, सत्यमेव जयते ग्रुपच्या वतीने बेलापूर गावाला जोडणारे जे उपरस्ते आहेत, त्या रस्त्याला झाडे लावण्याचे प्रयोजन असून त्याकरिता ग्रामपंचायतीने आम्हाला खड्डे घेऊन द्यावेत. तसेच वृक्ष लागवडीनंतर टँकरने त्याला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी घ्यावी. यावेळी सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि अंगणवाडी सेविकांना ग्रामसभेला उपस्थित राहणे बंधनकारक असताना ते उपस्थित का राहत नाहीत? असा सवाल सुधीर नवले यांनी केला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार मारुतराव राशिनकर यांनी झेंडा चौक, ध्वजस्तंभ इतरत्र हलवावा किंवा त्याची उंची कमी करावी, जेणेकरून होणारे अपघात कमी होतील, अशी सूचना मांडली.

घरकुलाबाबत विषय निघाला असता, माजी सरपंच महेंद्र साळवी यांनी सांगितले की, घरकुल योजनेचे निकष काय आहेत? किती घरकुल मंजूर झाले आहेत? बाकी किती आहेत? प्रत्येक घरकुलाला जागा किती देणार? याची माहिती ग्रामसभेत द्यावी, अशी मागणी केली. यावेळी अभिषेक खंडागळे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सुचनेनुसार अद्यावत सोयीयुक्त घरकुल कॉलनी तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यासाठी प्रत्येक घरकुल लाभार्थ्याला अर्धा गुंठा जागा घरकुलाला देणार असल्याचे सांगितले. तसेच घरकुल कसे असणार आहे? त्याचा प्लॅन कसा आहे? याची विस्तृत माहिती ग्रामसभेत दिली. त्याच वेळी महेंद्र साळवी यांनी घरकुल मिळालेल्या व्यक्तीकडून पैसे कशाचे मागता? तुम्हाला भ्रष्टाचार करायचा आहे का? कुणीही घरकुल लाभार्थी एक रुपया देणार नाही. त्याच्या नावावर जागा करून द्या. ज्याच्या ताब्यात जागा मिळेल, तो त्या पद्धतीने घरकुल बांधेल. ग्रामपंचायत नेत्यांनी व सदस्यांनी त्यात हस्तक्षेप करू नये असा मुद्दा मांडला.
या विषयाला माजी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले उत्तर देत असतानाच ग्रामस्थ, त्याचबरोबर सुधीर नवले, महेंद्र साळवी, भरत साळुंके व शरद नवले यांच्यात बाचाबाची झाली.

तुम्ही भ्रष्टाचार करत आहात असा आरोप महेंद्र साळवी, श्री.नवले व श्री. साळुंके यांनी केला. प्रत्येक घरकुल लाभार्थ्याकडून एक लाख 7 हजार रुपयांची मागणी कोणी केली? एक हजार घरकुलांचे पैसे किती होतात आणि ते पैसे कोणाला द्यायचे, कुणाच्या खिशात जाणार? असा सवाल साळवी यांनी केला.शरद नवले हे याबाबत उत्तर देत असतानाच ग्रामस्थांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी आम्ही कसलेही पैसे देणार नाही. आमच्या नावावर एक गुंठा जमीन सातबारा उतारा द्यावा, अशी जोरदार मागणी गायकवाड वस्ती येथून आलेल्या महिलांनी केली. या मागणीमुळे ग्रामसभेत गोंधळाला सुरुवात झाली. प्रचंड गदारोळ सुरू झाला, त्याचवेळी दत्ता कुर्‍हे, चंद्रकांत नाईक, विवेक वाबळे यांनी सांगितले की, बेलापूरला जागा मिळावी याकरता आम्ही देखील प्रयत्न केलेले होते. केवळ आपण एकट्यानेच याचे श्रेय घेऊ नये, असे मत मांडले. यावेळी एक लाख 7 हजार रुपये या विषयावरून वादावादीला सुरुवात झाली. चर्चा करताना माईक ओढाओढी झाली, त्यामुळे माईकही बंद पडला. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकारही झाला. वेळीच पोलिसांनी मध्यस्थी केली आणि जास्त गोंधळ वाढल्यामुळे पोलिसांनी जादा कुमक मागविली.

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आपल्या फौजफाट्यासह तातडीने ग्रामसभेच्या ठिकाणी दाखल झाले. दोन्ही बाजूचे म्हणणे पोलीस निरीक्षक देशमुख यांनी ऐकून घेतले. परंतु ग्रामसभा न संपताच नागरिकांच्या प्रश्नाला उत्तर न देताच सभा गुंडाळली असल्याचा आरोप सुधीर नवले, भरत साळुंके, महिंद्र साळवी आणि विक्रम नाईक यांनी केला, तर अभिषेक खंडागळे आणि शरद नवले यांनी नियमानुसार ग्रामसभेचे कामकाज संपुष्टात आले असल्याचे सांगितले. त्यावेळी दोन्ही बाजूने निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. कामकाज पुन्हा सुरू करून ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून घेण्याची मागणी करीत सुधीर नवले, महेंद्र साळवी, भरत साळुंके, विक्रम नाईक आदींनी ग्रामस्थांसह ग्रामपंचायत कार्यालयासमोर निषेधाच्या घोषणा देत ठिय्या आंदोलन सुरू केले.

तर ग्रामपंचायतीमध्ये शरद नवले, अभिषेक खंडागळे यांच्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांनी दादागिरी खपून घेणार नाही, अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. यामुळे वातावरण आणखीच चिघळले. अखेर तीन वाजता सुनील मुथा आल्यानंतर त्यांनी शरद नवले, अभिषेक खंडागळे, ग्राम विकास अधिकारी निलेश लहारे यांच्याशी चर्चा करून यावर तोडगा काढला. त्यानंतरही विक्रम नाईक यांनी ग्रामसभेतील माझे प्रश्न अनुत्तरीत आहेत, त्याचे उत्तर द्यावे, अशी मागणी केली. त्यावेळी अभिषेक खंडागळे यांनी आपल्या सर्व प्रश्नांना उत्तर दिले जाईल, असे आश्वासन दिले आणि शेवटी या वादावर पडदा पडला.

चांगल्या कामाला खिळ घालण्याचा प्रयत्न – शरद नवले
पत्रकारांशी बोलताना शरद नवले यांनी सांगितले की, आम्ही कुणालाही एक लाख रुपये मागणी केलेली नाही. ही केवळ विरोधकांनी पसरलेली अफवा असून भविष्यात येणार्‍या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून आम्हाला आणि चांगल्या कामाला खिळ घालण्याचा हा विरोधकांचा प्रयत्न आहे, परंतु तो सफल होणार नाही. नामदार राधाकृष्ण विखे यांच्या संकल्पनेनुसार आपण घरकुले बांधणार आहोत, परंतु यामध्ये कोणालाही सक्ती केली जाणार नाही. ज्यांची इच्छा असेल, अशांनाच यामध्ये समाविष्ट केले जाणार असल्याचे नवले यांनी सांगितले.

भ्रष्टाचार खपवून घेणार नाही – सुधीर नवले
याबाबत बाजार समितीचे सभापती सुधीर नवले यांनी सांगितले की, घरकुलाबाबत जसे ठेकेदाराकडून निविदा मागवल्या, तशाच निविदा सर्व कामांमध्ये का मागविल्या नाहीत? गावात चाललेला भ्रष्टाचार आणि निकृष्ट कामे हे कदापि खपवून घेतले जाणार नाही.

ताज्या बातम्या

प्रकाश

मंत्री गिरीश महाजनांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा; माधवी जाधव यांना प्रकाश...

0
नाशिक | Nashikमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये प्रजाकसत्ताक दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणामुळे वादाला तोंड फुटले आहे. मंत्री महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव...