Thursday, September 12, 2024
Homeनगरबेलापूरच्या ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्षपदावरून तंटा

बेलापूरच्या ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्षपदावरून तंटा

बेलापूर |वार्ताहर| Belapur

कोरम अभावी 31 ऑगस्ट रोजी तहकूब झालेली ग्रामसभा अखेर नुकतीच सरपंच महेंद्र साळवी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष निवडीबाबत वादळी चर्चा झाली. सरपंच महेंद्र साळवी यांनी हा विषय पत्रिकेवर घेऊनच चर्चा करू, असे आश्वासन दिल्याने वादावर पडदा पडला.

- Advertisement -

प्रारंभी ग्रामविकास अधिकारी मेघश्याम गायकवाड यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. त्यानंतर विविध शासकीय योजना आणि 15 व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत 2024-25 च्या आराखड्यावर चर्चा झाली. तसेच स्त्री जन्माचे स्वागत आणि बालविवाह मुक्तगाव आदी ठरावही मंजूर झाले. ऐनवेळच्या विषयात माजी सदस्य चंद्रकांत नाईक यांनी तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी प्रकाश जाजू यांच्या नावाची सूचना केली. ग्रा. पं. सदस्य रमेश अमोलिक त्यासाठी अनुमोदन देत असतानाच हा विषय पत्रिकेवर नसल्याचे कारण देत तसेच विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे यांचे काम चांगले असल्याने नवीन अध्यक्ष नेमण्याचा प्रश्नच येत नाही, असे सांगत माजी जि.प.सदस्य शरद नवले व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी विरोध करताच गावकरी मंडळ व विरोधी कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यामुळे सरपंच साळवी यांनी हा विषय पत्रिकेवर घेऊन निवड करण्यात येईल असे सांगितले. मात्र, त्यानंतरही चंद्रकांत नाईक व प्रफुल्ल डावरे यांच्यात शाब्दिक वादंग सुरूच होते. अखेर उपस्थितांच्या मध्यस्थीने त्या वादावर पडदा पडला.

यावेळी प्रगतिशील शेतकरी व ज्येष्ठ पत्रकार मारोतराव राशिनकर यांनी भंडारदरा धरणातून के. टी. वेअर बंधारे भरण्यासाठी पाणी राखीव ठेवावे व गावात प्लास्टिक बंदीचा ठराव मांडला. त्यास प्रकाश कुर्‍हे यांनी अनुमोदन दिले.

ग्रामसभेत तंटामुक्त अध्यक्षपदाचा वाद सोडला तर सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. ठराविक लोकांनीच माईकचा ताबा घेतल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या समस्या मांडता आल्या नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली.

ग्रामसभेस काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, माजी जि. प. सदस्य शरद नवले, बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, उपसरपंच अभिषेक खंडागळे, सदस्य रविंद्र खटोड, माजी सरपंच भरत साळुंके, चंद्रकांत नवले, मुश्ताक शेख, रमेश अमोलीक, माजी सभापती दत्ता कुर्‍हे, ईस्माईल शेख, महेश कुर्‍हे, पोलीस पाटील अशोक प्रधान, वैभव कुर्‍हे, दादा कुताळ, प्रसाद खरात, सचिन अमोलीक, तलाठी पी. बी. सूर्यवंशी, गोपी दाणी, अरुण अमोलीक, एकनाथ नागले, पुरुषोत्तम भराटे, शफीक बागवान, प्रभात कुर्‍हे, राजेंद्र कुताळ, नितीन नवले, विशाल आंबेकर, अजीज शेख, संतोष शेलार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

सरपंच नेमके कोणाचे ? हे त्यांनाच ठाऊक

अलीकडेच सरपंच महेंद्र साळवी आणि उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्यातील जाहीर वाकयुध्दाच्या पार्श्वभूमीवर या ग्रामसभेत नेमके काय घडते? याबाबत ग्रामस्थांना उत्सुकता लागून होती. मात्र, दोन्ही गटांना सरपंच आपलेच आहेत, अशी भावना झाल्याने तंटामुक्ती समितीचा अपवाद वगळता ही ग्रामसभा शांततेत पार पडली. मात्र, सरपंच नेमके कोणाचे आहेत? हे त्यांनाच ठाऊक.

- Advertisment -

ताज्या बातम्या