Saturday, September 12, 2026
Homeक्राईमShrirampur : बेलापूरच्या मुथ्था पिता-पुत्रावर सावकारकीचा दुसरा गुन्हा दाखल

Shrirampur : बेलापूरच्या मुथ्था पिता-पुत्रावर सावकारकीचा दुसरा गुन्हा दाखल

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

पाच लाख रुपये व्याजाने घेतल्यानंतर तब्बल सात लाख रुपये मुद्दल व व्याजाची रक्कम परत देऊनही पुन्हा पाच लाख 40 हजार रुपयांची मागणी करत आर्थिक पिळवणूक केल्याप्रकरणी बेलापूर बुद्रुक येथील खासगी सावकार सुनील मुथ्था व त्यांच्या मुलाविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात बेकायदेशीर सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुथ्था यांच्यावर यापूर्वीही सावकारकीचा एक गुन्हा दाखल आहे.

- Advertisement -

याप्रकरणी सतीश दगडू भालेराव (रा. गोंधवणी रोड, वॉर्ड क्र. 1, श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांनी फायनान्सवर घेतलेली महिंद्रा कंपनीची बोलेरो जीप कर्ज फेडून स्वतःच्या मालकीची केली होती. मात्र, आजारपण व घरगुती अडचणींमुळे पैशांची गरज भासल्याने नोव्हेंबर 2024 मध्ये बेलापूर येथील सुनील मुथ्था यांच्याशी संपर्क साधला. मुथ्था यांनी बेलापूर येथील ‘यश मोटर्स’ या कार्यालयात बोलावून घेतले. कामानिमित्त स्वतः न जाऊ शकल्याने फिर्यादीचा भाऊ तेथे गेला. त्यावेळी चारचाकी बोलेरो जीप गहाण ठेवण्याची अट घालून दरमहा पाच टक्के व्याजाने पाच लाख रुपये देण्याचे ठरले.

मात्र प्रत्यक्षात पहिल्याच महिन्याचे 32 हजार रुपये व्याज कापून केवळ चार लाख 68 हजार रुपये देण्यात आले. व्यवहाराची कोणतीही पावती देण्यास मुथ्था यांनी नकार दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. यानंतर वेळोवेळी रोखीने दोन लाख रुपये व्याज दिले. तसेच उर्वरित पाच लाख रुपये फिर्यादीचा भाऊ व नातेवाईक विजय ओहळ यांनी मुथ्था यांच्या कार्यालयात जाऊन अदा केले. या वेळी पैसे देतानाचा व्हिडीओही मोबाईलमध्ये चित्रीत असल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. अशा प्रकारे एकूण सात लाख रुपये दिल्यानंतरही मुथ्था यांनी बोलेरो जीप व तिची मूळ कागदपत्रे परत देण्यास नकार दिला.

गाडी व कागदपत्रांची मागणी केल्यावर सुनील मुथ्था व त्यांच्या मुलाने शिवीगाळ, धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली. येथे थांबलास तर तुझं तंगडं तोडीन, असे म्हणत लाथ मारली. तसेच आणखी पाच लाख 40 हजार रुपये आणून दे, अन्यथा गाडी मिळणार नाही, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. या वेळी लाकडी दांड्याने मारहाण करत फिर्यादी, त्यांचा भाऊ व नातेवाईक विजय ओहळ यांना कार्यालयातून हकलून दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 118(1), 308(4), 115(2), 352, 351(2), 3(5) तसेच महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 अंतर्गत कलम 39, 44 व 45 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : १२ सप्टेंबर २०२६ – शेतकरीवर्गासाठी कडवट निर्णय

0
भारत हा कृषिप्रधान देश असल्याचा अभिमान आपण बाळगतो; परंतु देशाच्या अर्थकारणात आणि धोरणात्मक निर्णयांमध्ये अन्नदाता असलेला शेतकरी नेहमीच दुर्लक्षित राहतो. शेतकर्‍याने उत्पादित केलेला कांदा...