Friday, November 15, 2024
Homeनगरसाईबाबांच्या पादुका व दानपेटीतील रकमेसह अकरा रिक्षांच्या बॅटर्‍यांची चोरी

साईबाबांच्या पादुका व दानपेटीतील रकमेसह अकरा रिक्षांच्या बॅटर्‍यांची चोरी

बेलापूर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ || श्रीरामपूर शहर पोलिसांना चोरट्यांचे आव्हान

बेलापूर |वार्ताहर| Belapur

बुधवारी रात्री चोरट्यांनी बेलापूर येथील श्री साईबाबा मंदिर, हनुमान मंदिर येथे चोरी केली. तसेच गावात बस स्टँड समोर नंबरला उभ्या असलेल्या नऊ रिक्षा तसेच रामगड येथील दोन रिक्षा अशा एकूण अकरा रिक्षांमधील बॅटरी तसेच एका रसवंती गृहामधील इन्व्हर्टर व तेथील बॅटरी चोरट्यांनी लांबविली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी माहिती घेत तपास आणि आरोपींचा शोध घेण्याबाबत आश्वस्त केले. सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे जाळे असूनही एकाच रात्रीत चोरट्यांनी एवढा प्रताप करून श्रीरामपूर शहर पोलिसांना जणू आव्हानच दिले आहे.

- Advertisement -

बेलापूर येथील साई पावन प्रतिष्ठानच्या मंदिराचे कुलूप तोडून साईबाबांच्या चांदीच्या पादुका तसेच दानपेटी घेऊन चोरटे फरार झाले. मंदिराच्या काही अंतरावरच ती दानपेटी फोडलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यातील रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. तसेच गावातील एस. टी. स्टँडसमोर नंबरला लावलेल्या नऊ रिक्षा तसेच रामगड येथे घरासमोर उभ्या असलेल्या दोन रिक्षा अशा अकरा रिक्षांच्या बॅटर्‍याही लंपास केल्या. जाताना रामगडजवळील हनुमान मंदिरातही दानपेटी व कपाट फोडून उचकापाचक केली. तसेच बेलापूर रोडवर नव्यानेच झालेले कोहीनुर रसवंतीचे इन्व्हर्टर व बॅटरी घेवून चोरटे पसार झाले. एकाच रात्री अनेक ठिकाणी चोर्‍या करून त्यांनी बेलापूर पोलिसांना आव्हानच दिले आहे.

काही दिवसापूर्वी रामगड येथील ओहोळ यांच्या घरात दिवसा चोरट्यांनी दागिने व रोख रक्कम घेऊन पोबारा केला होता. त्या घटनेचाही अजून तपास लागलेला नाही. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ याबाबत माहिती देण्यासाठी बेलापूर पोलीस स्टेशनला गेले असता अनेक वेळा आवाज देवूनही पोलीस स्टेशनला असलेला कर्मचारी झोपेतून उठला नाही. गावात रात्रीची गस्तही बंद झालेली आहे. अनेक ठिकाणी अस्ताव्यस्त वाहने उभी असतात. परंतु रात्रीही अन् दिवसाही पोलीस गावात फिरकत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शनिवारी तर झेंडा चौकात प्रचंड गर्दी होते. तक्रारी करुनही काहीच कारवाई होत नसल्यामुळे लोकही तक्रार करण्यास पोलीस स्टेशनला जात नाहीत. बेलापूर पोलीस स्टेशन अंतर्गत मोठा परिसर आहे. त्यामुळे येथे कार्यक्षम पोलिसांची नियुक्ती करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या