Monday, May 20, 2024
Homeनगरबेलापुरात महिलेच्या घरावर हल्ला

बेलापुरात महिलेच्या घरावर हल्ला

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

थकलेले बचत गटाच्या कर्जाचे हप्ते भरा, म्हणाल्याचा राग आल्याने पाच ते सहा जणांनी येथील खटकाळी भागात राहणार्‍या रुक्साना ईक्बाल शेख यांच्या घरावर हल्ला केला. लाकडी दांडके, कुर्‍हाड तसेच धारदार हत्याराच्या साह्याने घराच्या काचा, दरवाजे तोडून घरासमोर लावलेल्या दुचाकीही पेटवून दिल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

येथील पाहुणेनगर, खटकाळी गावठाण येथे रुक्साना ईक्बाल शेख या राहतात. बचत गटामार्फत कर्ज घेतलेल्या काही महिलांनी कर्ज वेळेवर भरले नाही. म्हणून रुक्साना यांनी कर्जाचे हप्ते वेळेवर भरण्याबाबत त्याच परिसरात राहणारे चव्हाण यांना सांगितले. त्याचा राग आल्यामुळे या दोन कुटुंबात वाद झाले होते. त्यावेळी मोठा जमाव बेलापूर पोलीस स्टेशनला जमा झाला होता. त्यावेळी तक्रार देण्यास कुणीही पुढे आले नाही. या गोष्टीचा राग मनात धरून राजेंद्र उर्फ पप्पू भिमा चव्हाण याने आपल्या चार ते पाच साथीदारांसमवेत लाकडी दांडके व धारदार हत्यारे घेऊन पहाटे तीन वाजेच्या सुमारास रुक्साना शेख यांच्या घरावर हल्ला चढविला.

घरातील खिडकीच्या काचा फोडून घराच्या पाठीमागील गेटचा दरवाजा तोडला, शिलाई मशिन फोडण्याचा प्रयत्न केला तसेच घरासमोर दोन मोटारसायकली लावलेल्या होत्या त्यावर पेट्रोल टाकुन त्या पेटवून दिल्या. त्यात ज्युपिटर गाडी नंबर एमएच 17-9183 ही जळून खाक झाली. हिरोहोंडा मोटारसायकलची मोडतोड करुन तीही पेटविण्यात आली. पोलिसांनी तातडीने ती आग विझवली व दोन्ही वाहने पोलीस स्टेशनला आणली. हा प्रकार चालु असतानाच रुक्साना शेख यांचेे नातेवाईक सुलताना युसुफ पठाण या मदतीला धावल्या असता त्यांच्यावर धारदार शस्राने वार केल्यामुळे त्या जखमी झाल्या आहे.

सदर घटनेची माहिती बेलापूर पोलिसांना कळविण्यात आली. तत्काळ सहाय्यक फौजदार सुधीर हाफसे, पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे, हरिष पानसंबळ, भारत तमनर, नंदू लोखंडे, पो. कॉ. संपत बढे हे घटनास्थळी दाखल झाले.

पोलीस आल्याचे पाहुन पप्पू चव्हाण, शहारुख शेख व त्यांच्या साथीदारांनी घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिसांनी तातडीने शहारुख सांडू शेख व पप्पू उर्फ राजेंद्र भिमा चव्हाण या दोघांना ताब्यात घेतले.

याप्रकरणी सुलताना युसुफ पठाण यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरोधात भा. द. वि. कलम 324, 427, 143, 147, 148, 149, 435 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन बोरसे हे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या