Saturday, July 27, 2024
Homeनगरबेलपिंपळगावफाटा येथे रास्तारोको; आश्वासनानंतर उपोषण पाचव्या दिवशी मागे

बेलपिंपळगावफाटा येथे रास्तारोको; आश्वासनानंतर उपोषण पाचव्या दिवशी मागे

बेलपिंपळगाव |वार्ताहर| Belpimpalgav

नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे आदिवासी समाजातील नागरिकांना जातीचे दाखले मिळावेत, नवीन रेशनकार्ड मिळावे, योग्य प्रमाणात धान्य दिले जात नसल्याने स्वस्त धान्य दुकान परवाना रद्द करावा आदी मागण्यांसाठी बेलपिंपळगाव ग्रामपंचायतीसमोर सरपंचांसह आदिवासी बांधवांनी सुरू केलेले उपोषण काल सोमवारी पाचव्या दिवशी मागे घेण्यात आले. वरील मागण्यांसाठी श्रीरामपूर-नेवासा रोडवर बेलपिंपळगावफाटा येथे रास्तारोको करण्यात आला. अधिकार्‍यांच्या आश्वासनानंतर उपोषण व रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले.

- Advertisement -

आदिवासी समाजातील नागरिकांना जातीचे दाखले मिळावे, कामधेनू संस्थेकडे असलेला स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा, नवीन रेशनकार्ड, ऑनलाईन बंद पडलेले रेशन चालू करणे, खराब व हरवलेले रेशन कार्ड परत मिळावे, आधार कार्ड काढून मिळावे यासाठी हे उपोषण सुरू होते. सरपंच कृष्णा शिंदे, उपसरपंच गणेश कोकणे ग्रामपंचायत सदस्य किशोर गारुळे, सामाजिक कार्यकर्ते वसंत कांगणे, विलास सरोदे उपोषणात सहभागी झाले होते.

बेलपिंपळगाव फाटा येथे उपोषणाला पाठिंबा म्हणून रास्ता रोको करण्यात आला. गावातील रेशन दुकानदार अंत्योदय कार्डधारकांना कमी प्रमाणात धान्य देत असल्याच्या तक्रारी केल्या. यावेळी नायब तहसीलदार संदीप चिंतामण, पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे, गटविकास अधिकारी श्री. पाटेकर, तलाठी श्रीमती रायपल्ली हे अधिकारी उपस्थित होते. नायब तहसीलदार यांनी लेखी स्वरूपात मागण्या मान्य असल्याचे सांगितले. उपविभागीय अधिकारी यांनी बुधवारी प्रत्यक्ष भेट देऊन मागण्या मान्य करण्यात येणार असल्याचे भ्रमणध्वनीवरून सांगितले.

सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. गावातील कामधेनू संस्थेकडे असलेला स्वस्त धान्य दुकान जैनपूर सोसायटीकडे चालवण्यासाठी देण्यात आल्याचे सांगितले. गावात बुधवारी तातडीच्या ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी ग्रामपंचायतीचा पूर्ण ठराव करून स्वस्त धान्य दुकान गावातील सहकारी सोसायटी किंवा ग्रामपंचायत कार्यालय चालवणार आहे.

शिवसेनेचे अशोक गायकवाड यांनी उपस्थित आंदोलन करणार्‍यांना मार्गदर्शन करताना तालुक्यातील सक्षम अधिकारी उपस्थित नसल्याने प्रांताधिकारी सुधीर पाटील यांना व्हिडीओ कॉल करून ग्रामस्थांच्या समस्यांबाबत चर्चा केली व बुधवारी समक्ष आंदोलन करणार्‍यांना भेट देऊन योग्य निर्णय घेतला जाईल असे सांगितले.

यावेळी मुळा कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर व आ. गडाख यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांनी देखील भेट दिली.

आंदोलन यशस्वी होण्यासाठी गावातील अशोक कारखान्याचे संचालक अमोल कोकणे, माजी सभापती वसंतराव रोटे, पंचायत समिती माजी सदस्य रवींद्र शेरकर, तंटामुक्ती अध्यक्ष भीमजी साठे, माजी अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, पोलीस पाटील संजय साठे, माजी सरपंच बाळासाहेब तर्‍हाळ, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गटकळ, सहकारी सोसायटीचे चेअरमन सुनीलराव शेरकर, वसंतराव भद्रे, योगेश शिंदे, अशोकराव शिंदे बाबासाहेब रोटे आदी नागरिकांनी योगदान दिले.

गेली 35 वर्षांपासून स्वस्त धान्य दुकानदार एकच असल्याने तो कुणाला जुमानत नव्हता. विशेष करून अंत्योदय व प्राधान्य कुटुंबाच्या लाभार्थींना हा कमी धान्य देत होता. यापुढे त्या दुकानदाराचा परवाना रद्द करून नवीन निवड करावी. जेणेकरून गोरगरीब यांच्यावर अन्याय होणार नाही.

– राजेंद्र साठे, माजी सरपंच बेलपिंपळगाव

गेल्या पाच दिवसांपासून बेलपिंपळगाव ग्रामपंचायतीसमोर ग्रामपंचायत कमिटी तसेच आदिवासी समाज उपोषणाला बसले असता गावातील हजारो पुरुष, महिला, तरुण मुले यांनी पाठिंबा दिला व हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी मदत केली, त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे आभारी आहे.

– कृष्णा शिंदे, सरपंच बेलपिंपळगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या