Thursday, June 13, 2024
Homeनाशिकऑनलाईनच्या नावाखाली लाभार्थी धान्यांपासून वंचित

ऑनलाईनच्या नावाखाली लाभार्थी धान्यांपासून वंचित

दिंडोरी | प्रतिनिधी

- Advertisement -

केंद्र सरकार जनतेसाठी मोफत धान्य उपलब्ध करून देत असताना दिंडोरी तालुक्यातील अनेक गोरगरीब लाभार्थी धान्यापासून वंचित असून तहसील कार्यालयातून कार्ड ऑनलाईन नसल्याचे कारण देवून टोलवाटोलवी केली जात असल्याचे चित्र आहे यासंदर्भात तात्काळ दखल घेवून पात्र गरजू लाभार्थ्यांना धान्य उपलब्ध करून द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव कावळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने शासन आपल्या दारी योजना सुरू करून देखील आजही गोरगरीब जनता अनेक शासकीय योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित राहत असल्याने जनतेत तीव्र नाराजी असून कामचुकार अधिकारी/कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

दिंडोरी तहसील कार्यालयातील प्रशासकीय यंत्रणेच्या आडमुठेपणा मुळे तालुक्यात सर्व सामान्य जनता त्रस्त असून गेली अनेक दिवसापासून या ठिकाणी संजय गांधी निराधार योजना, नवीन शिधापत्रिका काढणे, शिधा पत्रिकेत नवीन नावे समाविष्ट करणे, उत्पन्नाचे दाखले काढणे, जातीचे दाखले काढणे, यासारख्या किरकोळ कामांसाठी मोठ्या प्रमाणात पैसे मोजावे लागत असल्याचा आरोप केला आहे.

तहसील कार्यालयात वारंवार हेलपाटे मारून देखील रेशन कार्ड ऑनलाईन केले जात नसून यासंदर्भात अनेक वेळा तहसीलदार यांचे सोबत समक्ष चर्चा करून देखील प्रत्यक्षात कार्यवाही केली जात नाही. परिणामी केंद्र सरकार मोफत धान्य उपलब्ध करून देत असूनही अनेक गोरगरीब गरजू लाभार्थी धान्यापासून वंचित असल्याचे चित्र आहे.

काही दलालांच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकाकडून अवास्तव पैसे गोळा गेले जात असून त्यांच्यामार्फत सादर करण्यात आलेल्या प्रकरणांना मात्र तात्काळ मान्यता दिली जाते असा आरोप करत दिंडोरी तहसील कार्यालयातील कारभारात सुधारणा न झाल्यास यासंदर्भात थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना समक्ष भेटून तक्रार करणार असून तत्काळ तालुक्यातील सर्व सामान्य जनतेच्या शिधापत्रिका ऑनलाईन करून पात्र लाभार्थ्यांना धान्य उपलब्ध करून देण्याची मागणी वसंतराव कावळे यांनी केली आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या