Monday, May 27, 2024
HomeUncategorizedविविध योजनांचा लाभार्थ्यांना लाभ द्या

विविध योजनांचा लाभार्थ्यांना लाभ द्या

औरंगाबाद – Aurangabad

उभारी, बाल संगोपन, रोजगार हमी, जल जीवन मिशन (Water Life Mission), कृषी, महावितरण (MSEDCL) आदी विषयांसह शासनाच्या विविध योजना, उपक्रमांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Collector Sunil Chavan) यांनी अधिकाऱ्यांना केल्या. त्याचबरोबर अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करावेत, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

कन्नड (Kannada) येथील गजानन हेरिटेज (Gajanan Heritage) येथे तालुकास्तरीय आढावा बैठक पार पडली. यावेळी उप विभागीय अधिकारी जनार्धन विधाते, पोलीस निरीक्षक हेमंत मानकर, उपविभागीय कृषी अधिकारी प्रभोध चव्हाण, तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक, सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वजण कटिबद्ध आहेत. शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याबरोबरच उभारी प्रकल्पात आत्महत्याग्रस्त कुटुंबांना द्यावयाच्या मदतीचा प्रस्ताव तत्काळ सादर करावा. वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करावे. महसूल विभागाने गृह प्रकल्प आराखडा तयार करावा. कोविड लसीकरणाबाबत जागृती करावी. कोविड चाचण्या वाढविण्यावर भर द्यावा. व्यापारी, फेरीवाले, रिक्षा चालक आदींची कोविड चाचणी आवश्यक आहे. त्यांच्या चाचण्यांची देखील तपासणी करावी. तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशाही सूचना जिल्हाधिकारी चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. विभागांच्या कार्याबाबत बैठकीमध्ये.विधाते यांनी सविस्तर माहिती सादर केली.

उभारी प्रकल्पांतर्गत लाभार्थ्यांना मदत

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना उभारी प्रकल्पांतर्गत मदत देण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून उषा पवार, सुधा वाळुंजे यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रकल्पांतर्गत प्रशासनाकडून मदत करण्यात आली. त्याचबरोबर पालक अधिकारी यांच्याशीही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी संवाद साधला.

वृक्ष लागवडीस भेट

विठ्ठलपूर येथे इको बटालियनच्या माध्यमातून 99.20 हेक्टरवर 24 देशी प्रजातीच्या 51 हजार 428 वृक्ष लावण्यात आलेले आहेत. या लागवड क्षेत्रास जिल्हाधिकारी चव्हाण यांनी भेट दिली. वृक्ष संवर्धनासाठी बटालियनला निधी कमी पडू देणार नाही. गोगा बाबा टेकडी याठिकाणी चौकी आणि जवान तैनात करण्यात यावेत, असे बटालियनच्या अधिकाऱ्यांना सांगितले. अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, उप विभागीय अधिकारी जनार्धन विधाते, इको बटालियनचे लेफ्टनंट कर्नल मिथिल जयकर, एस.भटनागर, राजेश गाडेकर, सहायक वन सरंक्षक एस.यू. शिंदे, तहसीलदार संजय वरकड, एम. ए. शेख, वन विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मकरंदपुरात नर्सरीची पाहणी

प्रादेशिक वन विभागाच्या कन्नड शहरातील नर्सरीमध्ये असलेल्या जांभूळ, मोहगुणी, रक्तचंदन, करंज, मियावाकी घनवन प्रकल्प आदींची पाहणी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केली. तसेच वन विभागाकडून वृक्ष वाढीसाठी करण्यात येत असलेल्या कामाचे कौतुकही त्यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी यांचे बैठकीतील महत्त्वाचे निर्देश

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी औरंगाबाद-शिर्डी रस्ता विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यातून पर्यटकांना चालना मिळेल. अशा प्रकारे अधिकाऱ्यांनी पर्यटनास चालना देण्यासाठी पुढाकार घ्यावा.

महिला व बाल कल्याण विभागाच्या बाल संगोपन योजनेचा शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना लाभ देण्याची कार्यवाही करा.

जिल्ह्यात 850 हेक्टरवर वृक्षारोपण झालेले आहे. तालुक्यातील अधिकाऱ्यांनी परिसरात सामाजिक जबाबदारीने वृक्ष लागवड करावी व उद्दिष्ट पूर्ण करावे.

शबरी, रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या लाभासाठी सर्वेक्षण करा.

कोविड लसीकरण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी पुढाकार घ्यावा.कार्यालयाबाहेर संपूर्ण लसीकरण झाल्याचा फलक लावावा.

जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येकाला 55 लिटर पाणी देण्यासाठी नियोजन करा.

सुरू झालेल्या शाळांनी वृक्ष लागवडीवर अधिक भर द्यावा.

सुंदर माझे कार्यालय अंतर्गत सर्व कार्यालये आंतर्बाह्य स्वच्छ ठेवावीत. दस्तावेज सुस्थितीत ठेवावीत. सहा गठ्ठे पद्धत अवलंबवावी.

- Advertisment -

ताज्या बातम्या