कोलकाता । Kolkata
कोलकाता येथील आर.जी. कार वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट आहे. या घटनेच्या निषेधार्थ गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमध्येही मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू आहेत.
या आंदोलनाला ‘नबन्ना अभियान’ अस नाव देण्यात आलं आहे. अशातच काही आंदोलकांवर सरकारद्वारे कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईच्या विरोधात अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून या विरोधात आज भाजपाकडून पश्चिम बंगाल बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र, या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागलं आहे.
या दरम्यान भाजपच्या एका स्थानिक नेत्याच्या कारवर हल्ला झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. राज्यातील परिस्थिती चिघळताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक अज्ञात व्यक्ती भाजप नेते प्रियांशु पांडे यांच्या कारवर गोळीबार करताना दिसत आहे. हल्लेखोरानं पांडे यांच्या कारवर सहा राऊंड फायर केल्या. यामुळे कारची काच फुटली आणि गोळी कार चालकाला लागली. प्रियांशुदेखील या हल्ल्यात जखमी झाले आहेत. या हल्ल्यात एकूण दोन जण जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या हल्ल्यानंतर भाजपाचे नेते शुभेंदू अधिकारी म्हणाले की, “टीएमसीच्या गुंडांनी भाजपा नेत्याच्या वाहनावर गोळीबार केला. वाहन चालकाला गोळी लागली आहे. अशा प्रकारे ममता बॅनर्जी आणि टीएमसी भाजपाला रस्त्यावरून हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. बंद यशस्वी झाला असून लोकांनी याचे मनापासून स्वागत केले आहे. पोलीस आणि टीएमसी यापुढे भाजपाला घाबरवू शकणार नाही.”