अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
येथील सराफ व्यावसायिकाने सोने कारागीराकडे दागिने तयार करण्यासाठी दिलेले 90 ग्रॅम 50 मिलीग्रॅम सोने आणि दुरूस्तीसाठी दिलेली 35 ग्रॅम 780 मिलीग्रॅम वजनाची सोन्याची चेन असे आठ लाख 99 हजार 860 रुपये किमतीचे सोने त्याने परत न देता विश्वासघात केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सराफ व्यावसायिक विशाल प्रमोद बुर्हाडे (वय 39, रा. गुलमोहर रस्ता, आनंद शाळेसमोर, सावेडी) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
तपन गौर बेरा (रा. लक्ष्मीनारायण बिल्डींग, गणेश मंदिर समोर, तोफखाना) असे गुन्हा दाखल झालेल्या सोने कारागीराचे नाव आहे. विशाल बुर्हाडे यांचे अहिल्यानगर शहरात ‘एस व्ही बुर्हाडे ज्वेलर्स’ नावाचे सराफ दुकान आहे. दुकानासाठी ते बंगाली सोने कारागीर तपन बेरा याच्याकडे वेळोवेळी दागिने बनवून घेत असत. या वर्षभरात (2024-25) बुर्हाडे यांनी बेरा यास एकूण 407 ग्रॅम 910 मिलीग्रॅम 24 कॅरेट सोने दिले होते, त्यापैकी 317 ग्रॅम 857 मिलीग्रॅम दागिने त्याने तयार करून दिले. मात्र, उर्वरित 90 ग्रॅम 50 मिलीग्रॅम सोने आणि दुरूस्तीसाठी दिलेली सोन्याची 35 ग्रॅम 780 मिलीग्रॅम वजनाची चेन परत केली नाही.
दरम्यान, यासाठी बुर्हाडे यांनी वेळोवेळी त्याच्याशी संपर्क साधला असता, बेरा वारंवार उडवाउडवीची उत्तरे देत होता. अखेर 7 मार्च 2025 रोजी बुर्हाडे आणि त्यांच्या दुकानातील कारागीर महादेव सामंत हे तपन बेरा याच्या राहत्या घरी, लक्ष्मीनारायण बिल्डिंग, गणेश मंदिराजवळ, तोफखाना येथे गेले. मात्र, तो घरी न सापडल्याने त्यांनी त्याच्या पत्नीकडे विचारणा केली असता, तो दोन दिवसांनी परत येईल असे सांगण्यात आले. त्यानंतरही तपन बेरा याचा फोन बंद असल्याने बुर्हाडे यांनी त्याच्यावर विश्वासघाताचा आरोप करत कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.