Thursday, October 31, 2024
Homeशब्दगंधसावध एका तंत्रज्ञानाच्या हाका !

सावध एका तंत्रज्ञानाच्या हाका !

डॉ. दीपक शिकारपूर Dr. Deepak Shikarpur

मोबाईल टॉवर्समधून होणार्‍या उत्सर्जनाचा पशुपक्ष्यांवर आणि मानवावर विपरित परिणाम होत असल्याचा मुद्दा नेहमी चर्चेत असतो. टॉवर्स कमी असल्याने कोट्यवधी मोबाईल वापरकर्ते कॉल ड्रॉपच्या समस्येने त्रस्त झाले आहेत. मोबाईलवर बोलताना कोणती काळजी घ्यावी? रेंजची समस्या कशी हाताळावी?

- Advertisement -

एकविसाव्या शतकात संगणक आणि मोबाईल Mobile क्रांतीने जीवनपद्धतीचे सर्व संदर्भ बदलले आहेत. मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडियावरचा आपला वावर वाढतो तेवढा काळ आपल्याला इतरांच्या आयुष्यातल्या जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी दिसत असतात. तसा प्रयत्न आपण मुद्दाम करतो. सोशल मीडिया ही मुळात सगळे काही चढवून, वाढवून किंवा ग्लॅमरस करून दाखवण्याची जागा आहे. पोस्ट केलेल्या फोटोमध्ये सत्यापेक्षा ग्लॅमर जास्त असते. थोडक्यात, अनेकजण आपली खोटी प्रतिमा तयार करतात.

प्रतिमेची पूर्तता करण्यासाठी त्याला आवश्यक असे खाद्य कायम पुरवत असतात. याचा अतिरेक झाला की एकमेकांविषयी द्वेष, खोटेपणा, स्वतःविषयीचा न्यूनगंड अशा अनेक भावना मूळ धरतात. सतत दुसर्‍याशी स्पर्धा करणे, इतरांशी तुलना करणे याचा अतिरेक आपल्या निरोगी प्रकृतीसाठी घातक आहे. जी मुले-मुली दिवसातून दोन तासांपेक्षा जास्त वेळ इन्स्टाग्राम किंवा इंटरनेटवर असतात त्यांच्यापैकी अनेकांनी मानसिक नैराश्य आणि मानसिक तणाव जाणवतो हे सांगितले आहे. त्यांची स्वतःविषयीची प्रतिमा इतरांनी काय म्हटले यावर अवलंबून असते, अनेकांच्या मनावर इतरांनी केलेल्या टीकेचा प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे जास्त वावर असणार्‍या तरुण मुलांचा आत्मविश्वास अनेकदा कमीच असतो.

सोशल मीडियावर होणार्‍या स्तुतीमुळे किंवा टीकेमुळे तरुण मुला-मुलींची स्वतःची प्रतिमा दुभंगलेली असते. हे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी खूप घातक आहे. आपण कसे दिसतो, वजन किती आहे, शरीरयष्टी कशी आहे याविषयी तरुण मुले-मुली जास्त धास्तावलेली असतात. कुठल्याच काळ आणि गटातली माणसे याला अपवाद नाहीत. अगदी अकरा-बारा वर्ष वयोगटातली मुले-मुली इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅट वापरायला सुरू करतात. अशा वेळी त्यांच्यासमोर सायबर बुलिंगचा धोका अधिक असतो. सोशल मीडियावर अपरिचित लोकांशी संपर्क साधताना खबरदारी घेणे आवश्यक आहे.

सध्याच्या जागतिक न्यू नॉर्मलमध्ये तंत्रावलंबी (व्हर्च्युअल) जीवनपद्धती सर्वांच्या अंगवळणी पडली आहे. लहान बालकांपासून आबालवृद्ध संगणक, स्मार्टफोन अशी डिजिटल उपकरणे सहजी हाताळत आहेत. अधिकाधिक अ‍ॅॅप्स (मनोरंजन व ज्ञानप्राप्ती) वापरली जात आहेत. इलेक्ट्रॉनिक युगाच्या सुरुवातीपासून (सुमारे 1970) गेल्या 47 वर्षांमध्ये सर्वाधिक वेगाने प्रसार झालेले उपकरण म्हणजे सेलफोन Cellphone. या बाबतीत त्याने संगणकाला केव्हाच मागे टाकले आहे. किंबहुना, आता हँडसेटमध्येच परिपूर्ण संगणक समाविष्ट झाला आहे. आज जगाच्या सात अब्ज लोकसंख्येपैकी 34 टक्के लोक इंटरनेट वापरतात.

आपल्याकडे 50 कोटी सेलफोनधारक आहेत आणि त्यांची संख्या दरमहा 50 ते 60 लाखांनी वाढत आहे. भारतात लवकरच फाईव्हजीचे वारे वाढणार आहे. जिओ-गुगलच्या 30 हजार कोटींच्या करारामुळे भारतात फाईव्हजी तंत्रज्ञान विकासाला वेग येणार आहे. या स्पीडमुळे हाय-डेफिनेशन मूव्हीज, मोठे सॉफ्टवेअर्स अवघ्या काही सेकंदात डाऊनलोड करणे शक्य होणार आहे. अर्थात एखाद्या उपकरणाचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणात आणि सातत्याने होऊ लागल्यावर गेल्या काही वर्षांमध्ये, त्याच्याशी संबंधित असलेले विविध छुपे धोकेदेखील समोर येऊ लागले आहेत. सेलफोनवर सातत्याने आणि दीर्घकाळ बोलल्यामुळे कधी कधी हँडसेट गरम होतो हे बहुतेकांनी अनुभवले असेल.

हँडसेटमधून निघणार्‍या सूक्ष्म लहरींपासून दूर राहण्यासाठी करण्याच्या उपायांमधली सर्वात पहिली पायरी म्हणजे हँडसेटच शरीरापासून दूर ठेवणे. फोन हातात न घेताही आपल्याला त्यावर बोलू देणारी विविध ‘हँड्स-फ्री’ साधने आज बाजारात मिळतात. यामुळे दोन्ही हातही वाहनाच्या हँडलवर वा स्टिअरिंग व्हीलवर राहतात (अर्थात वाहन चालवताना फोनवर बोलू नये). दुसरे असे की हँडसेट आपल्या तळव्याने संपूर्णपणे झाकून, कानावर दाबून बोलू नये. हँडसेट अशा पद्धतीने धरल्याने मिळणार्‍या तसेच त्यामधून प्रक्षेपित होणार्‍या सिग्नलची ताकद कमी होते. अशा वेळी, सिग्नल पकडण्यासाठी, हँडसेट अधिक शक्ती खर्च करतो. परिणामी, त्यातून बाहेर पडणार्‍या रेडिएशनचे प्रमाणही वाढते. खरे तर हँडसेट कमीत कमी बोटे वापरून तळाजवळ पकडावा ज्यायोगे लहरींना अडथळा होत नाही आणि तो कमीत कमी शक्ती वापरून काम देऊ शकतो.

गर्दीच्या ठिकाणी इतर आवाज आणि कलकलाटामधून बोलणे नीट ऐकू येण्यासाठी आपण हँडसेट कानावर गच्च दाबून मोठ्याने बोलतो खरे परंतु त्याचे उलटेच परिणाम होतात. अशा वेळी जरा शांत जागा शोधून पुन्हा फोन करणे उत्तम. तसेच आणीबाणीचे प्रसंग वगळता, ‘रेंज’ कमी असलेल्या ठिकाणावरून दीर्घकाळ बोलत राहण्याचा प्रयत्न करून नका. एक तर रेंज मुळातच कमी असल्याने संभाषण अधूनमधून तुटत राहते. शिवाय अशा प्रसंगी हँडसेटदेखील जास्त ऊर्जा वापरतो आणि जास्त प्रमाणात सूक्ष्मलहरी बाहेर टाकतो. तसेच आपण वर वाचलेच आहे की शरीरावर पडणार्‍या रेडिएशनचे प्रमाण, सेलफोनवर बोलण्याच्या कालावधीशी थेट संबंधित असते. त्यामुळे सेलफोनवर तासन्तास न बोलता अशा वेळी लँडलाइन वापरणे चांगले. मोबाईल टॉवर्समधून होणार्‍या उत्सर्जनाचा मुद्दा नेहमी चर्चेत असतो. काहींचे मत आहे की, या उत्सर्जनाचा पशुपक्ष्यांवर आणि मानवावर विपरित परिणाम होतो. पण याचा ठोस पुरावा नाही.

अनेक प्रगत देशांनी आणि आफ्रिकेतही देशांनी देशांतर्गत फाईव्हजी सेवेला परवानगी दिली आहे. यात इंग्लंड, जर्मनी, एस्टोनिया, इटली, लाटविया, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, उरुग्वे, त्रिनिनाद, ऑस्ट्रेलिया, चीन, त्रिनिनाद, दक्षिण कोरिया इत्यादी देशांचा समावेश आहे. शंभर वर्षांपूर्वी अनेक नागरिक विमान प्रवास करायला घाबरत होते.

सध्या तरी कोट्यवधी मोबाईल वापरकर्ते कॉल ड्रॉपच्या समस्येने त्रस्त झाले आहेत. वापरकर्त्यांच्या संख्येनुसार नवीन टॉवर उभारणे बंधनकारक करणे अत्यावश्यक आहे. नवीन सेल टॉवर्सना जलदगतीने मंजुरी देण्यासाठी सरकार नवीन महसूल सामायिकरण तत्व (राज्य, स्थानिक संस्था) आखू शकते. यासाठी सरकारी इमारतीचा वापर (भाडेतत्वावर) केला जाऊ शकतो. त्याचबरोबर टॉवर्स बांधण्यासाठी डोंगराचा वापर करण्यास परवानगी दिली जायला हवी.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या