नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पर्थच्या मैदानावरील कसोटी सामन्यातील विजयासह बॉर्डर गावसकर स्पर्धेतील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत पहिल्या सामन्यात विजयी सलामी दिली आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करत भारतीय संघाने या कसोटी सामन्यात ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. या विजयामुळे या सिरीजमध्ये भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे.
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ५३४ धावांचे आव्हान दिले होते. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला ५८.४ ओव्हरमध्ये २३८ धावांवर गुंडाळले. यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, केएल राहुल, जसप्रीत बुमराह हे टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. तसेच भारत पर्थमधील या ओप्टस स्टेडियममध्ये विजय मिळवणारा पहिलाच परदेशी संघ ठरला. या मालिकेतील दुसरा सामना ६ डिसेंबरपासून सुरु होईल.
पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच पराभवाला सामोरे जावे लागलेय. याआधी ऑस्ट्रेलियाने या मैदानावर चार सामने खेळले होते, ज्यात त्यांनी विजय मिळवला होता. १९ जानेवारी २०२१ रोजी भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध गाबामध्ये विजय मिळवला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने ३१ वर्षांनी त्या मैदानावर टेस्ट सामना गमावला होता. त्यानंतर आता भारतीय संघानेही पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर कांगारूंना धुव्वा उडवला आहे.
पर्थ कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून कार्यवाहू कर्णधार जसप्रीत बुमराह याने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या डावात भारतीय संघ फक्त १५० धावांत आटोपल्यामुळे बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघ मागे पडतोय की, काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण कॅप्टन बुमराह आणि त्याला इतर गोलंदाजांनी दिलेली साथ याच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला १०४ धावांत रोखत पहिल्या डावात अल्प धावा करूनही ४६ धावांची आघाडी मिळवली.
त्यानंतर टीम इंडियाच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात पुनरागमन केले. पहिल्या ४ मधील देवदत्त पडीक्कल याचा अपवाद वगळता इतर तीनही फलंदाजांनी अप्रतिम खेळाचा नमुना पेश केला. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल या दोघांनी द्विशतकी भागीदारी केली. केएल राहुल आऊट होताच ही भागीदारी तुटली. केएल राहुलने ७७ धावा केल्या. त्यानंतर देवदत्त पडीक्कल २५ धावा करुन माघारी परतला. यशस्वी जयस्वाल याने सर्वाधिक १६१ धावा केल्या. त्यानंतर किंग कोहलीची शतकी खेळी आली. या त्रिकुटाच्या स्फोटक फलंदाजीनंतर भारतीय संघाने दुसरा डाव ६ बाद ४८७ धावांवर घोषित करत ऑस्ट्रेलियासमोर ५३४ धावांचे मोठे टार्गेट सेट केले.
टीम इंडियाने तिसऱ्या दिवशी डाव घोषित केला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाला ३ झटके दिले. नॅथन मॅकस्वीनी शुन्यावर बाद झाला. कॅप्टन पॅट कमिन्स २ आणि मार्नस लाबुशेन ३ धावांवर बाद झाले. मार्नस आऊट होताच तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवसाच्या खेळाला ३ बाद १२ धावांपासून सुरुवात केली.
उस्मान ख्वाजा ४ आणि स्टीव्ह स्मिथ १७ धावांवर बाद झाले. त्यानंतर ट्रेव्हिस हेड याने टीम इंडियाची काही काळ चिवट फलंदाजी करत भारताच्या गोटात चिंता वाढवली. मात्र हेडला फार वेळ टिकता आले नाही. हेडने १०१ चेंडूत ८९ धावा केल्या. मिशेल मार्श याने ४७ आणि मिचेल स्टार्कने १२ धावा केल्या. नॅथन लायन आला तसाच भोपळा न फोडताच परतला. हर्षित राणा याने अॅलेक्स कॅरी याला २६ धावांवर बोल्ड केले. यासह ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव आटोपला आणि भारताने सामना जिंकला.
दरम्यान, टीम इंडियाकडून दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या दोघांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. वॉशिंग्टन सुंदर याने दोघांना बाद केले. तर हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी या दोन्ही डेब्यूटंट्सने प्रत्येकी १-१ विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.