भडगाव । सुनील पाटील
केल्याने होत आहे रे आधी केलीचे पाहिजे या उक्तीप्रमाणे शेतीत घाम गाळला तर त्याचे फळ निश्चित मिळते हे विनोद परदेशी यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. नोकरी पेक्षा अधिकचे उत्पन्न शेतीतून मिळू शकते हे यानिमित्ताने सिध्द झाले आहे. त्यांना मृग बहारातुन यापेक्षा अधिक उत्पन्न मिळणार आहे.
बांबरूड प्र.ब.येथील शेतकर्याच्या मोसंबीला 91 हजार प्रती टन इतका विक्रमी भाव मिळाला आहे. त्यांच्या मळ्यात 25 टन मोसंबीचा माल तयार आहे. 45 टन ( मृग) बहार ही तयार आहे. विषेश म्हणजे गेल्या वर्षी ही त्यांची मोसंबी 70 हजार रूपये प्रती टन दराने विक्री झाली होती.
एकीकडे तीन वर्षांपासून शेतीची पार दैना झाली आहे. मात्र नियोजनबध्द शेती केली तर शेती नोकरीपेक्षा देखील भारी आहे, हे बांबरूड प्र.ब. येथील शेतकरी विनोद परदेशी यांनी कृतीतून सिध्द करून दाखविले आहे.
5 एकरात 23 लाखांचे उत्पादन
विनोद परदेशी यांनी 5 एकरात 800 मोसंबीचे झाडे लावले आहेत. सध्या त्यांच्या मोसंबीला आंबा बहार लागला आहे. साधारण 25 क्विंटल माल मळ्यात तयार आहे. व्यापार्याने त्यांच्या मळ्याची नुकतीच पाहणी करून मोसंबीला जागेवरच 91 हजार प्रती टन इतका भाव दिला आहे. सध्याच्या घडीला हा बाजारात विक्रमी भाव मिळाला आहे. याशिवाय मिर्ग्या बहार ( मृग) ला पण 35 हजाराचा दराने मागितला आहे. मात्र मृग बहार त्यांनी अद्याप विक्री केलेला नाही. आंबा बहारातुन विनोद परदेशी यांना 15लाखांचे उत्पादन मिळणार आहे.
…अन् खर्च साडेतीन लाख
परदेशी यांनी पाच एकरात कटोल बोल्ड या जातीचे 800 झाडांची लागवड केली आहे. एका झाडापासुन साधारण 1 क्विंटल माल निघत असल्याचे विनोद परदेशी यांनी सांगितले. या बागेसाठी त्यांना शेण खतासाठी 1 लाख, 1 लाखाचे रासायनीक खते, कीटकनाशक 50 हजाराची तर 1 लाख रूपये मजुरी असे एकुण साडेतीन लाख रूपये खर्च आला आहे. त्यातून पहिल्या टप्प्यात 23 लाखाचे उत्पन्न त्यांना मिळणार आहे. म्हणजे साधारण 18 लाखाचा निव्वळ नफा त्यांना मिळणार आहे.
शेती नियोजनबध्द रित्या केली तर ती फायद्याचीच ठरते. त्यामुळे शेतीला नाविण्याची जोड दिली तर त्यातुन चांगले उत्पन्न मिळू शकते. मला खर्च वजा जाता मोसंबीच्या पीकातून 18 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
– विनोद परदेशी, शेतकरी