नाशिक | प्रतिनिधी | Nashik
येवला येथील रुपचंद व विष्णू भागवत या दोघा भावंडांचे अपहरण करून ४ कोटी १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या सराईतांच्या टोळीतील एकास गुंडा विरोधी पथकाने पुण्यातील (Pune) हिंजवडीतून पकडले आहे. राकेश आबालाल सोनार (३१, रा. पाटील पार्क, चुंचाळे शिवार) असे पकडलेल्या सराईत संशयिताचे नाव आहे. ताे हिंजवडीत वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असतांना गुंडा विराेधी पथकाने ताब्यात घेतले.
त्याच्यावर इंदाैर व धुळे येथे गंभीर गुन्हे दाखल असून अनेक गुन्ह्यांत शिक्षाही लागली आहे. सध्या ताे उच्चन्यायालयाच्या आदेशाने जामीनावर हाेता. सीबीएस परिसरातील न्यायालयाच्या गेटजवळ २८ फेब्रुवारी रोजी ५ ते ६ सराईतांनी नियाेजनबद्ध प्लॅन आखत रुपचंद व विष्णु भागवत या दोघा भावंडांचे अपहरण (Kidnapping) केले. दोघांना कारमध्ये डांबून अपहरण करीत त्र्यंबकेश्वर, वाडीवऱ्हे, मुंबई रोड मार्गे नेले. दोघांना जीवे मारण्याची धमकी देत चार काेटी दहा लाख रुपयांची खंडणी मागितली.
तर, या रकमेतील पन्नास टक्के हप्ता म्हणजेच २ कोटी १० लाख रुपयांची व्यवस्था करण्यासाठी अपहरणकर्त्या खंडणीखाेरांनी रुपचंदला सोडून दिले तर विष्णु भागवत यास सोबत ठेवले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित फरार होते. तसेच संशयितांनी विष्णु भागवत यालाही नंतर साेडून दिले हाेते. गुन्हे शाखेने तपास करून त्याचवेळी संशयित वेदांत दत्तात्रय येवला (२१, रा. अशोकनगर, सातपूर) यास पकडले होते. त्यानंतर फरार असलेल्यांचा शोध सुरु होता.
दरम्यान, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) गुन्हे शाखेचे उपआयुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या सुचनेनुसार गुंडा विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर माेहिते यांनी पथकास सूचना केल्या. त्यान्वये संशयिताचा शोध सुरु असतानाच अंमलदार अक्षय गांगुर्डे व गणेश भागवत यांना राकेश सोनारची माहिती मिळाली. त्यानुसार अंमलदार विजय सुर्यवंशी, डी. के. पवार, प्रविण चव्हाण व अंमलदार पुण्यात जाऊन धडकले. त्यानंतर हिंजवडी परिसरातील सुसगाव येथे राहणाऱ्या राकेश सोनार यास पकडून नाशिकला आणले.
हे देखील वाचा : अधिकार्यांचा दृष्टीकोन यापुढे संपूर्ण सरकारी असला पाहिजे – गृहमंत्री अमित शाह
पत्नी जायची भेटायला
संशयित राकेश सोनार हा गुन्हा केल्यावर नाशिकहून फरार झाला. ताे येथून मध्यप्रदेश, मुंबई व पुणे येथे गेला. तेथेही त्याने अनेक गुन्हे केल्याचे उघड हाेत आहे. यानंतर ताे पुणे येथील हिंजवडी भागात स्थायिक झाला. भाडेतत्वावर रुम घेऊन एकटाच वास्तव्य करत हाेता. त्याने काही महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह केला असून ताे नाशिकला फारसा येत जात नव्हता. त्याची पत्नी त्याला पुण्यात भेटण्यासाठी जात हाेती. येथे ताे जुनी वाहने खरेदी विक्री करुन एजंट कम डिलरचे काम करत हाेता. तसेच त्याने येथे आपली ओळखही लपविली हाेती. पाेलिसांना साेनारची टीप मिळताच त्यांनी राकेशला पकडले.
दाेन खून, दाेन प्राणघातक हल्ले, नऊ गुन्हे
राकेश याच्यावर गंभीर स्वरुपाचे एकूण ९ गुन्हे दाखल आहेत. त्यात धुळे व इंदाैर येथे खुनाचे दाेन तर प्राणघातक हल्ल्याचे प्रत्येकी दाेन गुन्हे नाेंद आहेत. साेबतच अपहरण, मारहाण व इतर गुन्हे त्याच्यावर दाखल असून एक ते दाेन गुन्ह्यांत त्याला जन्मठेपेचेची शिक्षा लागली आहे. काही महिन्यांपासून ताे उच्च न्यायालयाच्या आदेशाने जामीनावर हाेता. तर, या आधी ताे पाच वर्ष तुरुंगात राहून आला आहे. तुरुंगात असताना त्याची ओळख अनेक सराईतांशी झाली असल्याने ताे सराईत गुन्हेगार बनल्याचे पाेलिसांनी सांगितले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा