अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीच्या जेऊर बायजाबाई (ता. नगर) शाखेतील 33 ठेवीदारांच्या तब्बल 94 लाख 14 हजार 296 रुपयांच्या ठेवी अडकल्या असून या प्रकरणी सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, मॅनेजर, कर्मचारी अशा 18 जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी जेऊर, बोल्हेगाव शाखेतून तपासकामी आवश्यक कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. काल, बुधवारी (23 ऑक्टोबर) पोलिसांनी सावेडी उपनगरातील पाईपलाइन रस्ता येथील मुख्य शाखेत धाड टाकून काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहे, अशी माहिती या गुन्ह्याचे तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी दिली.
ठेवीदार रोहिदास सदाशिव जाधव (वय 74 रा. जेऊर बायजाबाई) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चेअरमन भारत बबन पुंड, व्हा. चेअरमन आश्विनी भारत पुंड, संचालक बबन सहादू पुंड (तिघे रा. बेलपिंपळगाव, ता. नेवासा), वैभव बाळासाहेब विधाते (रा. जेऊर, ता. नगर), शोभाबाई गोरक्षनाथ विधाटे, जालींदर देवराम विधाटे, चंद्रशेखर गोरक्षनाथ विधाटे, सचिन दत्तात्रय विधाटे (सर्व रा. पाचेगाव, ता. नेवासा), अक्षय पांडुरंग शेलार (रा. बेलवंडी बु., ता. श्रीगोंदा), रावसाहेब नथु कळमकर (रा. श्रीरामपूर), भाऊसाहेब धोंडीराम गायकवाड (रा. माऊलीनगर, सावेडी), मॅनेजर प्रवीण दत्तात्रय राऊत (रा. शेंडी, ता. नगर), शुभम संजय धनवळे (रा. वाघवाडी, जेऊर, ता. नगर), कर्मचारी अनिकेत प्रवीण भाळवणकर, गायत्री राजेंद्र बनकर, पुनम अरविंद मगर, ऐश्वर्या बाळासाहेब गायकवाड, नितीन घुमरे (पूर्ण नाव नाही, सर्व रा. जेऊर बायजाबाई) यांच्यााविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक चौधरी करत आहेत. त्यांनी यापूर्वी जेऊर व बोल्हेगाव या शाखेतून तपासकामी आवश्यक असलेली कागदपत्रे ताब्यात घेतली होती. बुधवारी दुपारी त्यांनी पथकासह पाईपलाईन रस्ता येथील मुख्य शाखेत जाऊन काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. यावरून तपासाला गती येणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले. संशयित आरोपींनी कट कारस्थान करून 33 ठेवीदारांचा विश्वास संपादन करून मल्टीस्टेट सोसायटीमध्ये चालू व बचत खाते उघडून रोख रक्कम जमा केली. जास्त व्याजदर देतो, रक्कमा दामदुप्पट देतो असे आमीष दाखवून ठेवीदारांच्या रक्कमांच्या ठेवी ठेऊन घेतल्या. त्यानंतर ठेवीदार यांनी त्यांच्या पैशाची मागणी केली असता संशयित आरोपींनी 33 ठेवीदारांचे 94 लाख 14 हजार 296 रुपयांची परतफेड न करता विश्वासघात केला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
संशयित आरोपी पसार
गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित आरोपी पसार झाले आहेत. एमआयडीसी पोलिसांकडून त्यांचा तपास सुरू आहे. त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पसार झालेल्या संशयित आरोपींना अटक कधी करणार? असा सवाल ठेवीदारांकडून उपस्थित केला जात आहे.