अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीच्या सुमारे 54 कोटी 77 लाख रूपयांच्या अपहार प्रकरणी 13 आरोपींविरूध्द येथील जिल्हा व सत्र न्यायालयात 1 हजार 660 पानी दोषारोपपत्र एमआयडीसी पोलिसांनी दाखल केले आहे. त्यातील सहा आरोपींना अटक करण्यात आली असून इतर पसार आहेत. चेअरमन भारत बबन पुंड, व्हाईस चेअरमन आश्विनी भारत पुंड, संचालक बबन सहादू पुंड (तिघे रा. बेलपिंपळगाव ता. नेवासा), वैभव बाळासाहेब विधाते (रा. जेऊर बायजाबाई, ता. नगर), शोभाबाई गोरक्षनाथ विधाते, चंद्रशेखर गोरक्षनाथ विधाते, सचिन दत्तात्रय विधाते (तिघे रा. पाचेगाव, ता. नेवासा), अरूण शंकर खंडागळे (रा. भोकर, ता. श्रीरामपूर), लक्ष्मण निवृत्ती टेकाडे (रा. सरस्वती कॉलनी, देवकर वस्ती, वॉर्ड नंबर 7, श्रीरामपूर), रावसाहेब नथू कळमकर (रा. श्रीरामपूर), भाऊसाहेब धोंडीराम गायकवाड (रा. माऊलीनगर, गावडे मळा, पाईपलाईन रस्ता, सावेडी), अशोक मल्हारी मरकड (रा. तिसगाव, ता. शेवगाव, हल्ली रा. छत्रपती संभाजीनगर) व सचिन राजाराम घावटे (रा. शिरूर, जि. पुणे) यांच्याविरूध्द दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यातील भारत पुंड, आश्विनी पुंड, बबन पुंड, वैभव विधाते, शोभाबाई विधाते व भाऊसाहेब गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली असून ते सर्व न्यायालयीन कोठडीत आहेत.
जिल्ह्याभरातील विविध शाखेतील सुमारे 460 ठेवीदारांचा विश्वास संपादन करून त्यांना रकमा दामदुप्पट देण्याचे आमिष दाखवले. रोख रकमेच्या ठेवी घेऊन, डेली कलेक्शनव्दारे रकमा जमा करून घेतल्या. ठेवीदारांनी पैशाची मागणी केली असता चेअरमन भारत पुंड व इतर सहकार्यांनी सुमारे 54 कोटी 77 लाख 89 हजार 291 रूपयांच्या ठेवी परत फेड न करता रकमेचा अपहार करून विल्हेवाट लावली असल्याचा दोष ठेवण्यात आला आहे.
रोहीदास सदाशिव जाधव (जेऊर ता. नगर) यांच्यासह ठेवीदारांची जेऊर शाखेत फसवणूक झाल्याने जाधव यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी केला. दरम्यान, जिल्ह्यातील अनेक ठेवीदारांच्या ठेवी भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटमध्ये अडकल्या आहेत. या गुन्ह्याचे मनीट्रेल व फॉरेन्सिक ऑडिट करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. त्यानंतर 460 ठेवीदारांचे सुमारे 54 कोटी 77 लाख रूपये अडकल्याचे समोर आले. गुन्हा दाखल झाला त्यावेळी आरोपींची संख्या कमी होती. फॉरेन्सिक व मनीट्रेल ऑडिट मधून या अपहार प्रकरणात इतरांचा सहभाग निष्पन्न झाला. त्यांना यामध्ये आरोपी करण्यात आले आहे.
आणखी 12 संशयित निष्पन्न
गुन्हा दाखल झाला त्यावेळी अशोक मरकड व सचिन घावटे या दोघांचा फिर्यादीत उल्लेख नव्हता. मात्र फॉरेन्सिक व मनीट्रेल ऑडिट मधून त्यांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. अशोक मरकड याच्या खात्यात 17 कोटींपेक्षा जास्त रक्कमेची हेराफेरी झाली आहे. तर चेअरमन भारत पुंड याने अपहरातील रकमेतून घेतलेली जमीन सचिन घावटे याच्या नावावर केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी आणखी 12 संशयित आरोपी निष्पन्न केले असून त्यांच्याविरूध्द पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले जाणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी सांगितले.