Saturday, November 2, 2024

भजन

वैजयंती सिन्नरकर

मराठी मुलखाला लोककलांचा समृद्ध वारसा आहे खरा, पण कालौघात त्यातील अनेक कला लोप पावत चालल्या आहेत. त्या लोककलांची आणि ती पुढे नेणार्‍या अनोख्या परंपरांची ओळख करून देणारे नवे कोरे सदर..

- Advertisement -

संजय आपल्या कुटुंबासह ज्या कलेकडे आला त्याबाबत मुलांना सांगू लागला. मुलांनो, आता आपण भजन याबाबत जाणून घेऊया.

हरे राम हरे राम । राम राम हरे हरे

हरे कृष्ण हरे कृष्ण । कृष्ण कृष्ण हरे हरे

अशा गोड भजनात मुले तल्लीन झाली. तेव्हा संजय सांगू लागला.

देवाची स्तुतीपर काव्यरचना साग्रसंगीत म्हणून देवाला भजने किंवा आळविणे याला ‘भजन’ म्हणतात. हा योगसाधनेतील ‘भक्ती योगाचा’ भाग आहे. ही महाराष्ट्रातील एक लोककला आहे. महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर जेवढे संत जन्माला आले ते उत्तराखंडातले असो, हिमाचलातले असो, अरुणाचल प्रदेशातील असो वा महाराष्ट्रातील असो म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत निवृत्तिनाथ, संत सोपानदेव, संत एकनाथ, संत नामदेव संत चोखामेळा अशा अनेक संतांनी अनेक भजने तयार केली आहेत. त्यापैकी काही रचना पं. भीमसेन जोशी आणि अन्य गायकांनी गाऊन अजरामर केल्या आहेत. मुलांनो, प्रत्येक संतांनी त्यांचा भाव शब्दात मांडला, आपल्या विचारातून अनेकांपर्यंत पोहोचवला. ज्याला ज्याला तो भावला त्याने त्यांच्या काळामानाने तो मुखद्गत केला किंवा लिहून घेतला आणि तो आपल्याच आत्म्याचा अंतरिक भाव आहे या श्रद्धेने तो भाव व्यक्त करण्यासाठी पद्यरूपात सुरुवात झाली. स्थानिक स्तरावर संवादिनी (हार्मोनियम), मृदुंग, तबला, ढोलकी, टाळ, टाळ्या यांचा वापर करून देवळात देवासमोर बसून व घरीच संघटितपणे भजने गायली जात.

लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष पियू ब्रह्म रसावली

संत नामदेव महाराजांनी सांगितले की, भजन नुसते भजनासारखे नाही करायचे तर लावणी, मृदुंग, श्रुती, टाळ, घोष यांचे एकत्रिकरण करून ते करावे. अनेकजण एकत्र येऊन भजन करताना एक प्रोटोकॉल असतो. कुठलाही भेद सोडून भजन केले जाते. आर्त ही भजने माम गीतेत सांगितले आहे.

चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन । आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ।

अर्थार्थी हा प्राप्तीसाठी भक्ती करतो, तर आर्त भक्त संकटात देवाला आळवतो, जिज्ञासू भक्त भगवंताला जाणण्यासाठी भक्ती करतो तर ज्ञानी भक्त मात्र अनन्य भगवंताचे स्वरूप तत्त्वतः जाणतो आणि त्या स्वरुपाची भक्ती करतो. म्हणून भगवंताला तो अधिक प्रिय आहे, असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. गीतेमध्ये ‘भजन’ हा शब्द आला आहे. अर्जुनाने देवाला विचारले, देवा, तुझी स्तुती कशी करू? तुला कुठली स्तुती आवडते?

शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम् ।

आवडते का ?

कस्तुरी तिलकं ललाट पटले वक्ष: स्थले कौस्तुभं।

आवडते का?

देव म्हणाला, मला सर्वच आवडते. त्यातल्या त्यात मला आवडते ते म्हणजे

आर्ते ही भजनं ते माम..अर्थ असा की जेथे अर्तता आहे ते मला जास्त भावेल.

भजन हे सर्वत्र आहे. भजनांचे वेगवेगळे प्रकार आहेत.

पहिला प्रकार

1) चक्रीभजन – एखादा अभंग भजन म्हणून गायल्यानंतर त्याच्या शेवटच्या अक्षरापासून लगेचच दुसरा अभंग म्हणण्यास सुरुवात करतात याला चक्रीभजन म्हणतात.

2) सोंगी भजन – या प्रकारात देव भक्ताच्या संवादाचा उपयोग सोंगे घेऊन करण्याची पद्धत आहे म्हणून याला सोंगी भजन असे नाव आहे.

3) रिंगण भजन – या प्रकारात तीन वेगवेगळे भजन मंडळी गोलाकार उभी राहून एकापाठोपाठ एक क्रमाने अभंग गातात व भजन करतात. यातून भजनाचेही रिंगण बनते म्हणून याला रिंगण भजन असे नाव आहे. भक्तियोगाची साधना म्हणून याला चांगला प्रतिसाद लाभलेला दिसून येतो .

भजनाची सुरुवात जयजयकाराने होते. त्यानंतर नमनाचे श्लोक असतात. नंतर पुन्हा जयजयकार आणि नंतर ‘राम कृष्ण हरी’चे भजन सुरू होते. त्यानंतर रूपपर मागणीपर अभंग म्हटले जातात. पहिले पाच अभंग कोणते म्हणायचे ते ठरलेले असतात. त्याला ‘पंचपदी’ म्हणतात. बुक्का लावल्यानंतर कोणतेही अभंग म्हणणे संमत असते. सर्व अभंग म्हटल्यावर गौळणी म्हणतात. भजनांचा शेवट ‘भैरवी’ ने होतो. शेवटी परत जयजयकार करतात. महाराष्ट्रात भजन परंपरा भक्तिपूर्ण परिणामकारक म्हणून प्रसिद्ध आहे.

‘हरे कृष्ण हरे कृष्ण’ ‘कृष्ण कृष्ण हरे हरे’

हा जगद्अनुभवी मंत्र माहिती नाही असा माणूस शोधून कोणाला सापडणार नाही. पण एकच ‘चैतन्य महाप्रभू’ का झाले? कारण त्यांच्या म्हणण्यात अर्तता होती.

‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’

मंत्र बहुश्रुत आहे. पण एकच ‘वासुदेवानंद सरस्वती’ का झाले? तर त्यांची या भजनाविषयी अर्तता होती.

नामा आठविता सद्गती त्यांची

म्हणजे अर्तता भजन करताना कंठ दाटून नयनातून अश्रू यावेत. मग ते तुम्ही समूहाने करत आहात की एकटे करत आहात? ऐकणारे खूप श्रोते आहेत की कोणीच नाही? त्याने फरक पडत नाही. पण भजन करताना एकरूप होणे ही त्या भजनकर्त्याची कला.

भजने अनेक आहेत, पण मनातला भाव जिथे उच्चारला जातो आणि ‘सहज अवस्था’ ज्याला म्हणतात त्याला ‘साधनजन्य अवस्था’ म्हणतात. ती साधनजन्य अवस्था भजनाने होते. संत गुलाबराव महाराजांनी भजनाने देव मिळवला. त्यांचे भजन

कृष्ण माझी माता

कृष्ण माझा पिता

सख्या सोयरा बंधू

कृष्ण माझा

अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर भजन हा प्लॅटफॉर्म आहे, आत्मउद्धार हा त्याचा शेवट. भजनाने मनावर संस्कार होतात आणि तो संस्कार परमेश्वरापर्यंत नेतो. भजन गोडी निर्माण करण्याचे माध्यम आहे आणि त्याचा पूर्ण परिहार भगवंत.

भजनाचे महत्त्व कळले का तुम्हाला?

अनेक कारणांमुळे भजन ही संकल्पना हळूहळू लोप पावते की काय, असे वाटू लागले आहे. मात्र अजूनही ग्रामीण महाराष्ट्रात ही परंपरा अनेक ठिकाणी सुरू आहे, ती सुरूच राहायला हवी. चला मग आपण ही कला टिकवण्याचा प्रयत्न करूयात. श्रीराम जय राम जय जय राम असे भजन म्हणत मुले पुढच्या लोककलेकडे निघाली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या