भाळवणी |वार्ताहर|Bhalwani
पारनेर तालुक्यातील (Parner) भाळवणी (Bhalwani) येथील स्टेट बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी (ATM Broke) गॅस कटरचा वापर करून फोडले. एटीएममधून चोरट्यांनी 25 लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे.
याबाबत माहिती अशी की, शनिवारी (दि. 10) पहाटे अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सकाळी साडेसातच्या सुमारास दिगंबर किराणा दुकान मालक गोविंद कळमकर दुकान उघडण्यासाठी आले असता एटीएमचे (ATM) शटर बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने त्यांनी गाळा मालक रोहिदास रोहोकलेंशी संपर्क साधला. रोहोकले यांनी शटर उघडले असता, सीसीटीव्ही कॅमेर्यांवर काळा स्प्रे मारलेला दिसून आला.
तसेच एटीएम (ATM) गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्यात आल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. चार चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून पारनेर पोलिस (Parner Police) आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपींच्या शोधासाठी स्वतंत्र पथके रवाना केली आहेत.




