भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara
भंडारदरा धरणाच्या पाणलोटात सोमवारी रात्री पुन्हा पुनरागमन केल्याने धरणात नव्याने पाणी येत आहे. गत 24 तासांत 306 दलघफू पाणी दाखल झाले. 11 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरातील पाणीसाठा काल सायंकाळी 3343 दलघफू झाला होता. आज बुधवारी सकाळपर्यंत हा पाणीसाठा 31 टक्क्यांवर गेला आहे. पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने धरणात रविवारी दिवसभरात केवळ 56 दलघफू पाणी दाखल झाले होते. सोमवारी दिवसभर ढगाळ हवामान होतें पण रात्री 8 वाजेनंतर आषाढ सरी जोरदार बरसल्या. रात्रभर अधूनमधून पाऊस कोसळत होता. त्यामुळे मंगळवारी धरणात 306 दलघफूने वाढ झाली आहे.
शुक्रवारी आणि शनिवारी आषाढ सरींनी तांडव केल्याने रविवारी धरणात नव्याने विक्रमी 680 दलघफू पाण्याची आवक झाले होते. पाणलोटातील चेरापुंजी समजल्या जाणार्या घाटघर आणि रतनवाडीत शनिवारी रात्री अक्षरशः धो-धो पाऊस कोसळल्याने डोंगरदर्यांमधून धबधबे आक्राळ विक्राळ रूप धारण केले होते. भातखाचरांमध्ये तुंडूब झाल्याने भात आवणीच्या कामांना वेग आला आहे. मंगळवारी दिवसभर पावसाचा जोर कमी होता.
पण सायंकाळनंतर आषाढसरींचा फेरा वाढला होता. सायंकाळी 5 वाजता सुरू झालेला पाऊस 8वाजेपर्यंत सुरू होता. त्यानंतरही अधूनमधून सरी बरसत होत्या. गत 24 तासांत पडलेला पाऊस असा (मिमी) भंडारदरा 46, घाटघर 57, पांजरे 41, रतनवाडी 63. निळवंडे धरणातील साठा हळुवार वाढत आहे. काल सकाळी या धरणातील पाणीसाठा 1037 दलघफू (12.45टक्के) झाला होता. निळवंडेत 38, अकोलेत 23 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
दारणा 28 टक्के, भावली 33 टक्के गंगापूरधील पाणी 27 टक्क्यांवर
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर गेल्या तीन दिवसांपासून पावसाने काहिशी उघडीप दिली आहे. अधून मधून येणार्या सरींनी पाणी साठ्यात वाढीचे सातत्य आहे. दारणात 27.79 टक्के, भावली 32.50 टक्के, तर गंगापूर 26.27 टक्क्यांवर पोहचले आहे.
काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासांत दारणाच्या भिंतीजवळ 10 मिमी, मुकणे 4 मिमी, भावली 33 मिमी, वाकी 15 मिमी, भाम 34 मिमी, घोटी 18 मिमी, इगतपूरी 30 मिमी असा पाऊस नोंदला गेला. दारणा धरणात 24 तासांत 261 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. 7149 दलघफू क्षमतेच्या दारणात काल सकाळ पर्यंत 1987 दलघफू पाणी साठा झाला होता. हे धरण 27.79 टक्के भरले आहे. भावलीत 44 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. शुन्य साठा असणार्या या धरणात आता पर्यंत 466 दलघफू नवीन पाणी एकूण दाखल झाले आहे. मुकणे 8.14 टक्क्यांवर, वाकी 3.89 टक्क्यांवर, भाम 26.62 टक्क्यांवर, वालदेवी 8.74 टक्क्यांवर पोहचले आहेत.
गंगापूर धरणाचा पाणी साठा 26.27 टक्के इतका आहे.5630 दलघफू क्षमतेच्या या धरणात 1479 दलघफू पाणीसाठा आहे. काल या धरणात 49 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. गंगापूर समुहातील कश्यपी 5.13 टक्के, गौतमी गोदावरी 16.76 टक्के, तसेच कडवा 22.33 टक्के असा पाणी साठा आहे. नांदूरमधमेश्वर बंधारा तुडूंब भरलेला असल्याने या बंधार्यातुन पावसाचे नवीन दाखल होणार्या पाण्याचा गोदावरीत विसर्ग करण्यात येत आहे. काल सकाळी 202 क्युसेकने या बंधार्यातुन गोदावरीत पाणी सोडणे सुरु होते.
काल सकाळी संपलेल्या 24 तासात गोदावरी कालव्यांवरील पाऊस असा- कोपरगाव 10 मिमी (एकुण 120 मिमी), कोळगाव 12 मिमी (एकूण 153 मिमी), सोनेवाडी 7 मिमी (एकूण 89 मिमी), शिर्डी 15 मिमी (एकूण 134 मिमी), राहाता 11 मिमी (एकूण 129 मिमी), रांजणगाव 12 मिमी (183 मिमी), चितळी 3 मिमी (145 मिमी) असा पाउस नोंदला गेला.
मुळात 374 दलघफू पाणी दाखल
कोतूळ |वार्ताहर| Kotul
मुळा धरणाच्या अकोलेतील पाणलोटात कमी अधिक आषाढसरींचा खेळ सुरू असल्याने काल दिवसभर अकोलेतील मुळा नदीचा विसर्ग कमी अधिक होत होता. तरीही धरणात नव्याने 374 दलघफू पाणी दाखल झाले आहे. काल सायंकाळी धरणातील पाणीसाठा 7105 दलघफू झाला होता.
आषाढ सरींनी तीन- चार दिवसांपूर्वी जोर धरला होता. पण आता या सरींचा वेग मंदावल्याने मुळा नदीचा विसर्ग कमी झाला असून परिणामी मुळा धरणात पाण्याची आवक रोडावली आहे. रविवारी पाणलोटात पाऊस झाल्याने सोमवारी सकाळी संपलेल्या 12 तासांत धरणात नव्याने 474 दलघफू पाणी दाखल झाले होते. पण त्यानंतर मुळा नदीचा प्रवाह कमी झाला होता. काल सकाळी या धरणातील पाणीसाठा 6731 दलघफू (26 टक्के) झाला होता.
दरम्यान, मुळा पाणलोटातही सोमवारी सायंकाळी 6.30 वाजेनंतर मान्सूनचे पुनरागमन झाल्याने दिलासा मिळाला आहे. रात्री 9.30 वाजेपर्यंत आषाढ सरी जोरदार बरसत होत्या. त्यामुळे मुळा नदीत रात्रीतून पाणी वाढले. पण नंतर पाऊस कमी झाल्याने सकाळी मुळा नदीचा कोतूळ येथील विसर्ग 1633 क्युसेक होता. नंतर पाऊस वाढल्याने दुपारी 2.30 वाजता 3416 क्युसेक होता. सायंकाळी तो पुन्हा 1873 क्युसेक होता.
नगर-जामखेडचा संपर्क तुटला
मुसळधार पावसामुळे पर्यायी पूल गेला वाहून
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर-जामखेड महामार्गावरील कडा येथील तात्पुरता पूल वाहून गेल्याने पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा संपर्क तुटला आहे. नगरमार्गे जामखेड, बीड, उस्मानाबादला जाणारी वाहतूक वाहतूक बंद झाली आहे. यामुळे सोमवारी दिवसभर प्रवाशांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला. जिल्हा प्रशासनाच्यावतीने त्यास दुजोरा देण्यात आला. गेल्या वर्षभरापासून जामखेड-नगर मार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. पावसाळ्यापूर्वीच कडा येथील जुना पूल पडला होता.
यामुळे पर्यायी तात्पुरता पूल तयार करण्यात आला होता. सोमवारी रात्री कडा, आष्टी परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने कडी नदीला पूर आला होता. या पुरात तात्पुरता पूल वाहून गेला आहे. यामुळे नगर-जामखेड मार्गे प्रवास करणार्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. या मार्गावरून जाणार्या वाहनांनी पर्यायी रस्त्याचा अवलंब करावा, असे आवाहन आष्टीचे तहसीलदार प्रमोद गायकवाड यांनी केले आहे. मराठवाड्यातील वाहनांना पुणे, मुंबईला जाण्यासाठी नगर-जामखेड महामार्गाचा पर्याय आहे. तसेच जामखेडसह आष्टी तालुक्यातील बहुतांश विद्यार्थी नगरला शाळा, कॉलेजसाठी ये-जा करतात. कडा येथील पूल वाहून गेल्याने या प्रवाशांना सोलापूर रोडने मिरजगाव-माहीजळगाव-जामखेड या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला.
हा आहे पर्यायी मार्ग
नगरकडे जाणारी वाहतुक कडामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक कडा ते धामणगावमार्गे तर आष्टीकडून जाणारी वाहतुक शिराळ मार्गे मिरजगाव, नगरसाठी वळविण्यात आली आहे. तसेच नगरहून सोलापूर रोडने मिरजगाव-माहीजळगाव-जामखेड हा देखील पर्याय असल्याचे सांगण्यात आले.