भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara
आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी भंडारदरा आणि मुळा पाणलोटात सुरू झालेला पाऊस दुसर्या दिवशी सोमवारीही सुरू होता. आठ-दहा दिवसांपूर्वी पाणलोटात जोरदार पाऊस झाल्याने भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झाले. त्यानंतर निळवंडेतही जोरदार आवक झाल्याने प्रवरा नदीत पाणी सोडण्यात आले. या हंगामात प्रवरेला प्रथमच पूर आला होता. पण त्यानंतर पावसाने या भागातून काढता पाय घेतला. नदीतील विसर्गही अत्यंत कमी झाला. रविवारी अचानक दुपारी जोरदार पाऊस झाला. या पावसाची नोंद 10 मिमी झाली. सोमवारी दिवसभरात 5 मिमी पाऊस झाला.
वाकी तलावातून 45 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा 10735 दलघफू (97.25टक्के) होता. निळवंडेत 7376 दलघफू (88.57टक्के) साठा असून नदीत 1258 तर कालव्यातून 330 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. मुळा पाणलोटातील हरिश्चंद्र गड, आंबित,पाचनई, कोतूळ येथे शनिवारी पाऊस झाला. रविवारीही रिमझीम सुरू होती. त्यामुळे शुक्रवारच्या तुलनेत रविवारी मुळा नदीतील कोतूळ येथील विसर्ग काहीसा वाढला होता. 795 क्युसेकने नदी वाहती होती. कालही दिवसभर अधूनमधून पाऊस सुरू आहे.
गोदावरी पुन्हा वाहती
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
नाशिक भागातील दमदार पावसाने गोदावरी पुन्हा वाहती झाली आहे. सोमवारी गोदावरीत नांदूर मधमेश्वर बंधार्यातून 1614 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. तीन दिवसांपूर्वी गोदावरी नदीतील विसर्ग बंद करण्यात आला होता. परंतु रविवारी व सोमवारी झालेल्या पावसाने पुन्हा गोदावरीत पाणी दाखल झाल्याने हे पाणी नांदूर मधमेश्वरमध्ये येऊन पुन्हा गोदावरीत सोडण्यात आले आहे. नांदूर मधमेश्वर बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे वरून वाहुन येणारे नवीन पाणी खाली जायकवाडीच्या दिशेने सोडण्यात आले आहे.
सकाळी 6 वाजता 1614 क्युसेकने बंधार्यातून विसर्ग सुरू होता. सकाळी 10 वाजता हा विसर्ग 2411 क्युसेक इतका करण्यात आला. नंतर 2 तासांनी 12 वाजता पुन्हा कमी करून तो 1614 क्युसेकवर आणण्यात आला. त्यामुळे गोदावरी पुन्हा वाहती झाली आहे. गंगापूर व दारणाचे विसर्ग बंद आहेत. दारणात भावलीतून 73 क्युसेक, भाम मधून 330 क्युसेक तर वालदेवीतून 35 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. दारणा 87.58 टक्के भरलेले आहे. गंगापूर 86.68 टक्के भरले आहे. तर भाम, भावली, वालदेवी, आळंदी ही धरणं काठोकाठ भरलेली आहेत.