भंडारदरा 48 तर निळवंडे 42 टक्के भरले
भंडारदरा/अकोले |वार्ताहर| Bhandardara|Akole
निसर्गाच वरदान लाभलेल्या भंडारदरा धरण पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर ओसरला. तरी देखील डोंगरांवरील पाणी धिम्या गतीने धरणात विसावत आहे. बुधवारी सायंकाळी 6 वाजता भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 47.70 टक्के तर निळवंडेचा 41.73 टक्क्यांवर पोहोचला आहे. यावरून गुरुवारी भंडारदरा धरण निम्मे भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मान्सूनचे आगमन झाल्यापासून काही दिवस जोरदार बॅटिंग केल्याने मोठ्या प्रमाणात नवीन पाणी धरणात जमा झाले आहे. यामुळे जून महिन्यातच दोन्ही मोठी धरणे भंडारदरा आणि निळवंडे निम्मे भरण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहे.
दरम्यान, रात्रीपासून काहीसा पावसाचा जोर ओसरला असून, भंडारदरा येथे 20, घाटघर 33, पांजरे 17, रतनवाडी 48, वाकी 9 आणि निळवंडे, आढळा व अकोले येथे 0 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यातच वातावरणातही कमालीचा गारवा निर्माण होत असल्याने जनजीवनासह पशुधनही गारठले आहे. यावर उपाय म्हणून शेतकरी शेकोट्या पेटवून ऊब घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
देवठाण येथील आढळा मध्यम प्रकल्पात नव्याने मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत असल्याने पाणीसाठा बुधवारी सायंकाळी 6 वाजता 80.85 टक्के झाला आहे.
मुळात 11 हजार 471 दलघफूट पाणीसाठा
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरी तालुक्यातील मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अधून-मधून पाऊस होत असल्याने धरणात पाण्याची आवक कमी- अधिक होत आहे. काल सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास 2 हजार 441 क्युसेसची आवक सुरू झाली. धरणात सध्याचा पाणीसाठा 11 हजार 471 दलघफू झाला असून काल (दि. 25) सकाळी आवक 2 हजार 934 क्युसेस सुरू होती. धरणात पाणीसाठा 11 हजार 30दलघफू होता.
तसेच मंगळवार दि. 24 रोजी सायंकाळी 6 वाजता धरणात पाण्याची आवक 5 हजार 16 क्युसेस होती. पाणीसाठा 11 हजार 68 दलघफू इतका होता. गेल्या 24 तासात काल सायंकाळपर्यंत मुळा धरणात 403 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली.
गोदावरीतील विसर्ग 11,079 क्यूसेकवर
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
काल बुधवारी दिवसभर दारणा, गंगापूरच्या पाणलोटात पाऊस मंदावला आहे. इगतपुरी तालुक्यात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरींचे आगमन होत होते. दारणा धरणाचा विसर्ग 4,742 क्यूसेकवर स्थिर आहे. पाण्याची आवक घटल्याने गंगापूरचा विसर्ग 6,160 क्यूसेकवरून 1,760 पर्यंत खाली आणला आहे. नांदूरमधमेश्वर बंधार्यातून गोदावरीत पडणारा विसर्ग घटवून 11,079 क्यूसेकवर आणण्यात आला आहे. जायकवाडी जलाशयात काल सायंकाळी 6 वाजता उपयुक्त साठा 28.6 टीएमसी झाला आहे.
काल दारणा व गंगापूर या दोन्ही धरणांच्या परिसरात पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक मंदावली आहे. काल सकाळपर्यंत दारणा धरणात 383 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. 1 जूनपासून या धरणात 3.7 टीएमसी पाणी नव्याने दाखल झाले आहे. दारणा समूहातील भावली धरण 73.85 टक्के भरले आहे. वाकी 56.50 टक्के, भाम धरणात 52.84 टक्के भरले आहे.
गंगापूर समूहातील गंगापूर धरणाच्या पाणलोटात कालही पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे या धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग घटविण्यात आला आहे. काल सायंकाळी 6 वाजता या धरणातून 1,760 क्यूसेकने विसर्ग सुरू होता. गंगापूर समूहातील गंगापूरचा साठा 59.72 टक्के, कश्यपी 52.54 टक्के, गौतमी गोदावरी 35.06 टक्के असा पाणी साठा आहे.
अन्य धरणांचा साठा असा – मुकणे 50.57 टक्के, वालदेवी 51.37 टक्के, कडवा 46.68 टक्के, आळंदी 42.71 टक्के, भोजापूर 78.12 टक्के, पालखेड 72.74 टक्के असे प्रमुख धरणांतील साठे आहेत.
वरील धरणांतून पाण्याची आवक सुरू असल्याने नांदूरमधमेश्वर बंधार्यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत 11,079 क्यूसेकने विसर्ग सुरू होता. काल सकाळी 6 वाजेपर्यंत या बंधार्यातून गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने 6.7 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. खाली जायकवाडीत गोदावरीतून काल सायंकाळी 6 वाजता 18,987 क्यूसेकने पाण्याची आवक होत होती. हे धरण 37.42 टक्के भरले आहे. मृतसह एकूण साठा 54.7 टीएमसी इतका झाला आहे, तर उपयुक्त साठा 28.6 टीएमसी इतका झाला आहे.




