Sunday, September 8, 2024
Homeनगरभंडारदरा 70 टक्के भरले, मुळा नदीला पूर

भंडारदरा 70 टक्के भरले, मुळा नदीला पूर

36 तासांत 1407 दलघफू पाण्याची आवक

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

पाणलोटातील चेरापुंजी समजल्या जाणार्‍या घाटघर, रतनवाडीत धो-धो पाऊस सुरू असल्याने काल सायंकाळी संपलेल्या 36 तासांत तब्बल 1407 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. हा हंगामातील विक्रम आहे. त्यामुळे 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल सायंकाळी 7590 दलघफू (68.77 टक्के) झाला होता. पाऊस सुरूच असल्याने रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हा पाणीसाठा 7698 दलघफू (70 टक्के) झाला आहे. आज गुरूवारी पाणीसाठा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

पाणलोटात मंगळवारपासून आषाढसरींचे तांडव सुरू असल्याने डोंगर दर्‍यांमधील धबधब्यांनी आक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. ओढे-नाल्यांना पूर आला असून ते धरणात विसावत आहेत. रतनवाडीत साडे बारा इंच पाऊस झाला. त्यामुळे धरणातील पाणीसाठा आता तासागणिक वाढू लागला आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत धरणांत 803 दलघफू नवीन पाणी आले होते. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 6986 दलघफू (63.28 टक्के) झाला होता. त्यानंतर दिवसभर जोरदार पाऊस होत असल्याने धरणात वेगाने पाणी येत आहे. काल सायंकाळपर्यंत 604 दलघफू पाणी आले. गत 36 तासांत 1407 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. या विक्रमी आवकेमुळे भंडारदरातील पाणीसाठा वाढत आहे. सायंकाळी साठा 7590 दलघफू (68.77 टक्के) झाला होता.

पाऊस सुरूच असल्याने रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हा पाणीसाठा 70 टक्के झाला आहे. पाणलोटातील चेरापुंजी समजल्या जाणार्‍या घाटघर आणि रतनवाडीत तुफानी पाऊस सुरू असल्याने जिकडे पहावे तिकडे पाणीच पाणी दिसत आहे. भातखाचरांमधून पाणी वाहत आहे. डोंगरदर्‍या, रस्ते धुक्यांनी अंधारून गेले आहेत. या पावसामुळे जनजीवन गारठून गेले आहे. जनावरांचे हाल सुरू झाले असून पाणलोटातील धुण्या पेटल्या आहेत.

निळवंडे पाणीसाठा 30 टक्क्यांवर

भंडारदरात सुरू असलेला जोरदार पाऊस व अन्य ठिकाणच्या छोट्या नद्या आणि ओढेनाल्यांचे पाणी येत असल्याने निळवंडे धरणातील पाणीसाठाही वेगाने वाढत आहे. भंडारदरात काल दिवसभर पडलेल्या पावसाची नोंद 39 मिमी झाली आहे. वाकीचा ओव्हरफ्लो 604 क्युसेकपर्यंत वाढला आहे. त्यामुळे या धरणातील पाणीसाठा 30 टक्क्यांच्यापुढे आहे. 8030 दलघफू क्षमतेच्या या धरणातील पाणीसाठा काल सकाळी 2321 दलघफू (27.87टक्के) होता.

मुळा धरणातील साठा 11135 दलघफू

कोतूळ |वार्ताहर| Kotul

पाणलोटातील हरिश्चंद्र गड, पाचनई, आंबित व अन्य भागात आषाढ सरींचे तांडव दुसर्‍या दिवशीही सुरू असल्याने अकोलेतील मुळा नदीला पूर आला आहे. पहिल्यांदाच हा पूर आल्याने आज मुळा धरणात विक्रमी आवक होणार आहे.

हरिश्चंद्रगड परिसरात तर धुव्वाधार पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे जनजीवन गारठून गेले आहे. गेल्या तीन दिवसांपासून या ठिकाणी धुव्वाधार पाऊस पडत असून आज पावसाचे प्रमाण आणखी वाढले. यामुळे ओढेनाले नद्या खळखळून वाहत आहेत. मुळा नदीला मोठा पूर आला आहे मुळा नदीच्या पुरामुळे मुळा धरणाकडे मोठ्या प्रमाणावर आवक सुरू आहे मुळा नदीतून बुधवारी सकाळी 6 वाजता 10,342 चा विसर्ग होता. धो-धो पाऊस सुरू असल्याने तो सकाळी नऊ वाजता 16,750 क्युसेसवर गेला. त्यानंतर दुपारी त्यात आणखी वाढ झाली. तो दुपारी 12 वाजता 24,452 क्युसेस झाला तर सायंकाळी त्यात विक्रमी वाढ होऊन 25,828 क्युसेस विसर्ग झाला मुळा नदीतून धरणाकडे हा विसर्ग झेपावत होता त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर आवक सुरू आहे

26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणाचा साठा सायंकाळी सहा वाजता 11,135 दशलक्ष घनफूट झाला आहे. दरम्यान, पाऊस सुरू असल्याने भात पिके तरारली आहेत. तसेच अन्य पिकांनाही फायदा आहे. नदीकाठच्या काही ठिकाणी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. धुव्वाधार पाऊस सुरू असल्याने या भागातील जनजीवन गारठून गेले असून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या