प्रवरा नदीत विसर्गात वाढ
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पुन्हा एकदा पावसाला जोर चढल्याने धरणांत येणार्या नवीन पाण्याने पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होत आहे. यामुळे भंडारदरा धरणाचा पाणीसाठा शनिवारी सायंकाळी 6 वाजता 7752 दलघफू (70.22 टक्के) तर निळवंडेचा 5353 दलघफू (64.28 टक्के) झाला आहे. पावसाचा जोर असल्याने पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाने 6863 क्युसेकने प्रवरा नदीपात्रात विसर्ग सोडला आहे.
धरण पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने ओढे-नाले, डोंगरदर्यांवरुन मोठ्या प्रमाणात पाणी धरणांकडे झेपावत आहे. यामुळे धरणांतील पाणीसाठा वाढत चालला आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर 15 जुलै च्या आत दोन्ही धरणे ओसंडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत (शनिवारी सकाळी 6 वाजेपर्यंत) भंडारदरा धरणात 438 दलघफू तर निळवंडेत 426 दलघफू नवीन पाणी दाखल झाले आहे. याचबरोबर आढळा धरण ओव्हर फ्लो झालेले असून, 198 क्युसेकने नदीत विसर्ग सुरू आहे. पावसामुळे वातावरणात कमालीचा गारवा असल्याने जनजीवन आणि पशुधन गारठून गेले आहे. आदिवासी शेतकरी शेकोट्या पेटवून ऊब घेत असताना पाहायला मिळत आहे.
मुळा धरणात 15 हजार 291 दशलक्ष घनफूट पाणीसाठा
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
मुळा धरणात शनिवार 5 जून रोजी सकाळी आवक 4 हजार 429 क्युसेस व पाणीसाठा 15 हजार 16 दशलक्ष घनफूट झाला होता. परंतु काल दिवसभरात पाणलोट क्षेत्रातून धरणाकडे आवक वाढली. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ती 8 हजार 769 क्युसेस झाली व पाणीसाठा 15 हजार 291 दलघफू झाला आहे. धरणात गेल्या 24 तासात 587 दलघफू व आतापर्यंत एकूण 6 हजार 385 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली आहे. मुळा धरणाचा पाणीसाठा जवळपास 56.55 टक्क्यावर पोहचला आहे.
दारणा, गंगापूर पाणलोटात पावसाचा जोर, भाम भरले
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर दारणा, गंगापूर धरणाच्या पाणलोटात काल जोरदार पाऊस झाला. त्यामुळे धरणातील विसर्ग काही प्रमाणात वाढविण्यात आले आहे. भावली पाठोपाठ भाम धरणही काल 100 टक्के भरले. खाली जायकवाडी जलाशयात उपयुक्त साठा 50 टक्के होण्याच्या मार्गावर आहे.
काल दारणा धरणाच्या पाणलोटातील इगतपुरी, घोटी परिसरात मुसळधार पाऊस झाला. दारणा समूहातील भावली पाठोपाठ भाम धरणही काल दुपारी दोन वाजता पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर त्याच्या सांडव्यावरून 2,017 क्यूसेकने विसर्ग सुरू झाला आहे. दारणाच्या पाणलोटातील इगतपुरी, घोटी परिसरात काल मुसळधार पाऊस झाला. दारणा धरणात पाण्याची आवक वाढली आहे. काल सायंकाळी 5,132 क्यूसेकने सुरू असलेला विसर्ग 1,480 क्यूसेकने वाढविला. तो 6,642 क्यूसेक करण्यात आला. भावलीतून 701 क्यूसेक, भाममधून 2,017 क्यूसेक, वाकीमधून 505 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे दारणा धरणातील विसर्गात वाढ होऊ शकते.
दारणात काल सकाळी मागील 24 तासात 431 दलघफू पाण्याची आवक झाली. दारणा धरणातून काल सकाळी सहा वाजेपर्यंत एकूण 4.8 टीएमसी पाण्याचा विसर्ग दारणा नदीत नंदुरमधमेश्वर बंधार्याच्या दिशेने करण्यात आला. गंगापूर धरणाच्या पाणलोटात काल अंबोली व त्र्यंबक येथे मुसळधार पाऊस झाला. काल सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंत या दिवसभरातील 12 तासात आंबोलीला 121 मिमी पावसाची नोंद झाली. त्र्यंबकला 58 मिमी पावसाची नोंद झाली. कश्यपिला 15 मिमी, गौतमीला 80 मिमी, तर गंगापूरच्या भिंतीजवळ 14 मिमी पावसाची नोंद झाली. काल गंगापूर धरणातून गोदावरीत 3716 क्यूसेकने विसर्ग सुरू होता.
नवीन पाण्याची आवक पाहता रात्री 8 वाजता या विसर्गात 940 क्यूसेकने वाढ करून तो 4656 क्यूसेक करण्यात आला आहे. खाली नांदुरमधमेश्वर बंधार्यात दारणा धरणातून 6642, गंगापूर मधून 4656, पालखेड धरणातून 1356, भोजापूर 38, वालदेवी 65 क्यूसेक असे विसर्ग सुरू आहेत. हे पाणी नांदूर मधमेश्वर बंधार्यात दाखल होत असल्याने या बंधार्यातून गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने 15775 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. या विसर्गात वाढ होऊ शकते. काल सकाळी 6 पर्यंत या बंधार्यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत एकूण 16.5 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
जायकवाडी आज निम्मे होणार
जायकवाडी जलाशयात 10259 क्यूसेकने पाण्याची आवक गोदावरीतून होत होती. काल सायंकाळी या जलाशयात 48.82 टक्के उपयुक्त साठा होता. म्हणजेच 37.44 टीएमसी उपयुक्त साठा तयार झाला होता. तर मृतसह एकूण साठा 63.51 टीएमसी इतका झाला आहे. या धरणातील उपयुक्त साठा 50 टक्क्यांच्या पुढे सरकणार आहे.




