Tuesday, May 28, 2024
Homeनगरभंडारदरा लाभक्षेत्रातील चार्‍या तात्काळ सुरु करणार

भंडारदरा लाभक्षेत्रातील चार्‍या तात्काळ सुरु करणार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे खरीप पिकांची स्थिती दयनिय झाली आहे. त्यामुळे त्वरीत चार्‍या सुरु करण्याची मागणी भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीने पाटबंधारे खात्याच्या वडाळा उपविभागीय कार्यालय येथे उपविभागीय अभियंता श्री. कल्हापुरे यांच्याकडे केली. त्यावर कल्हापुरे यांनी चार्‍या सोडण्याचे लेखी आश्वासन दिल्याने लाभधारक शेतकर्‍यांनी 21 ऑगस्ट पर्यंत पाणी अर्ज भरुन द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -

पावसाळा सुरु झाल्यापासून भंडारदरा लाभक्षेत्रात पुरेसा पाऊस पडला नाही. त्यामुळे संपुर्ण खरीप पिकांची स्थिती दयनिय झाली असल्याने खरिप हंगाम धोक्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर लाभक्षेत्रातील चार्‍या त्वरित सुरु कराव्यात या मागणीसाठी भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीच्या कार्यकर्त्यानी वडाळा उपविभागीय कार्यालय श्रीरामपूर येथे जावून उपविभागीय अभियंता श्री. कल्हापुरे यांची भेट घेवून आपल्या मागणीचे निवेदन दिले. त्यात मागणी अर्ज नसल्याने चार्‍या सोडण्याबाबत अडचणी येत असल्याचे अभियंता श्री. कल्हापुरे यांनी सांगितले.

त्यावर भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीच्या कार्यकर्त्यानी आम्ही लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना पाणी मागणी अर्ज भरण्यासाठी आवाहन करतो तुम्ही चार्‍या सुरु करा, अशी मागणी केली. त्यावर अभियंता श्री. कल्हापुरे यांनी सहमती दर्शवल्याने सकारात्मक तोडगा निघाला. उपविभागीय अभियंता श्री. कल्हापुरे यांनी चार्‍या सोडण्याबाबत लेखी दिले. त्यानुसार आवर्तन चालु असतानाच चारीनिहाय शेतकर्‍यांनी 21 ऑगस्ट पर्यंत अर्ज भरण्यासाठी आवाहन भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीच्या कार्यकर्त्यानी केले आहे. सदर मागणीबाबत अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनीही फोनवरील चर्चेनंतर दुजोरा दिला.

श्रीरामपूर तालुक्याचा हा परिसर निळवंडे व जायकवाडी धरणाच्या कात्रीत सापडलेला आहे. त्यामुळे आपल्या लाभक्षेत्रात पाणी मागणी वाढवण्यासाठी बिगर अर्जी सिंचन करणे शेतकर्‍यांना भविष्यात खुप धोकादायक ठरु शकते. आपल्या तालुक्याचे हक्काचे पाणी वाचवण्यासाठी सर्वांनी जेवढ्या क्षेत्रावर सिंचन करणार आहात ते पाणी अर्ज भरुन भिजवावे व आपली चारापिके व इतर भुसार पिके जगवावीत, असे आवाहनही भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीने लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना केले. याप्रसंगी सुरेश ताके, जितेंद्र भोसले, भरत आसने, दत्तात्रय लिप्टे, किशोर पाटील, रवी वाबळे, रामचंद्र पटारे, राजेंद्र भांड, संदीप गवारे, जगन्नाथ भोसले, ईश्वर दरंदले, विजय बडाख, नामदेव येवले, जालिंदर लवांडे, बाबासाहेब बडाख, बाळासाहेब बडाख, विकास ढोकचौळे आदी शेतकरी उपस्थित होते.

जितके क्षेत्र सिंचन केले जाईल, तितक्याच क्षेत्रावर पाणी पट्टी आकारली जाईल. कुणाला सातबारा मागणी होणार नाही. तसे परिपत्रक अहमदनगर पाटबंधारे विभागाने दि. 11 रोजीच दिले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी आपली खरीप भुसारपिके व चारापिके भरुन घ्यावे.

भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समिती

- Advertisment -

ताज्या बातम्या