Monday, May 19, 2025
Homeनगर84 लाख रुपये खर्चून ब्रिटिशांनी बांधलेल्या भंडारदरा धरणाला पूर्ण होणार 100 वर्ष

84 लाख रुपये खर्चून ब्रिटिशांनी बांधलेल्या भंडारदरा धरणाला पूर्ण होणार 100 वर्ष

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

- Advertisement -

भंडारदरा धरण उभारणीस यावर्षी 100 वर्षे पूर्ण होत आहेत. ब्रिटिशकालीन धरणाचा पाठीचा कणा आजही ताठ असून स्थापत्य शास्त्राचा हा अप्रतिम ठेवा आहे. अवघे 84 लाख रुपये खर्चून हे धरण 1926 ला पूर्ण झाले. आधी शेती सिंचनासाठी कालवे व नंतर गूळ-चुनाखडी वापरून दगडात धरणाची उभारणी झाली. 1875 मध्ये श्रीरामपूर-राहाता भागात पाण्यासाठी कालवे झाले. त्या पाटाला पाणी मिळावे म्हणून संगमनेर तालुक्यात ओझर येथे 1885 ला पिकअप वॉल बांधण्यात आली.

1905 ला धरणाच्या जागेचे सर्वेक्षण झाले होते. 1910 ला भंडारदरा धरणाच्या कामास सुरुवात झाली आणि विल्सन डॅम 1926 ला पूर्णत्वास गेला.त्यावेळी साधन सामग्री फारशी नसतानाही केवळ 16 वर्षात 10 हजार 86 दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमतेचे दगडी धरण तयार झाले. 47 चौरस किलोमीटर पाणलोट क्षेत्र असलेल्या धरणाच्या भिंतीची उंची 278 फूट असून केवळ 84 लाख 14 हजार 188 रुपये धरणासाठी खर्च झाले आहेत.23 हजार 77 हेक्टर सिंचन क्षमतेच्या भंडारदरा धरणाची आधी कालवे मग धरण अशी ख्याती आहे.ओझर उन्नेय बंधार्‍यापासून पुढे डावा कालवा 76 व उजवा कालवा 53 किलोमीटर लांबीचा आहे.

1973 ला भंडारदरा धरणाच्या भिंतीचे बळकटीकरण करण्यात आले. त्यात 131 बोअर घेऊन शिसे ओतण्यात आले असून त्यामुळे 540 टनाने भिंतीची दाब क्षमता वाढली आहे. 194 बोअर घेऊन त्यात प्री स्ट्रेस केबल टाकण्यात आली आहे. केबलचे वजन 210 टन व लांबी 10 हजार 553 फूट आहे. बळकटीसाठी 14 बटरेस बांधण्यात आले आणि स्पील वे गेट बसविण्यात आले.यातून प्रति सेकंदाला 53 हजार क्युसेक पुराचे पाणी वाहून जावू शकते.

सह्याद्रीचा काळा पाषाण बेसॉल्ट खडकावर 85 मीटर उंचीचा 11039 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा कवेत घेऊन धरण दिमाखात उभे आहे. स्वित्झर्लंड बनावटीचे व्हॉल्व्ह बसवून सिंचन मोर्‍या तयार केलेल्या आहेत. येथील खडकाची दाब सहन करण्याची क्षमता 7 हजार मेट्रिक टन इतकी आहे. बुडीत पाणलोट 21 किलोमीटर लांब असून जवळपास 60 मीटरपर्यंत पाण्याचा दाब असतो. पाण्याचा 60 टक्के दाब जवळच्या टेकडीवर स्थिरावतो. केवळ 40 टक्के दाब हा भिंतीवर येतो, असे इंजिनिअरिंग तंत्र या धरणासाठी वापरण्यात आले आहे. कोकणात पाणी वाहून जाऊ नये म्हणून ब्रिटिशांनी साम्रदजवळ 350 मीटर लांबीचा सॅडल डॅमही बांधला आहे.

39 गाण्यांचे चित्रीकरण
1940 पासून 104 चित्रपटांचे व 39 गाण्यांचे चित्रीकरण भंडारदरा, रंधा परिसरात झाले आहे. तुफानी, 1985 ला गाजलेल्या राम तेरी गंगा मैली चित्रपटातील तुझे बुलाये ये मेरी बाहे.. सह इतर गाण्यांचे चित्रीकरण भंडारदरा धरणाच्या बागेत प्रसिद्ध अम्ब्रेला फॉलजवळ झाले. अभिनेत्री मंदाकिनी यातून रुपेरी पडद्यावर झळकल्या. धरण भिंतीच्या पायथ्याला असलेल्या या बागेत सजनी ग भुललो मी, काय जादू झाली हे भिंगरी या मराठी चित्रपटातील सुषमा शिरोमणी व विक्रम – गोखले यांच्या अभिनयात साकारलेले गीत आजही अनेकांच्या ओठी आहे. कुर्बान, प्रेम या सिनेमांचे चित्रीकरण, तसेच ये धरती चाँद सितारे हे गीत रंधा धबधब्याजवळच चित्रित झाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Rahuri : गोठ्यात वीज प्रवाह उतरल्याने चार गायी दगावल्या

0
उंबरे |वार्ताहर| Umbare राहुरी तालुक्यातील धामोरी खुर्द येथे गायांच्या गोठ्यात वीज प्रवाह उतरल्याने चार गाई दगावल्याने शेतकर्‍याचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. धामोरी खुर्द...