Friday, July 5, 2024
Homeनगरभंडारदरा आणि मुळा धरणपाणलोटात जोरदार पाऊस

भंडारदरा आणि मुळा धरणपाणलोटात जोरदार पाऊस

कुकडीत पहिल्यांदाच पाण्याची आवक || दारणा, भावली धरणात नवीन पाणी

329 दलघफू पाण्याची आवक, वाकी 60 टक्क्यांवर

- Advertisement -

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

उत्तर नगर जिल्ह्यातील शेती, पिण्याचेे पाणी, व्यापार आणि उद्योगांसाठी जिवनदायिनी ठरलेल्या भंडारदरा पाणलोटात सोमवारी रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत असल्याने धरणात पाण्याची जोरदार आवक होत आहे. काल सायंकाळी संपलेल्या 24 तासांत धरणांत नव्याने तब्बल 329 दलघफू पाणी दाखल झाले. या हंगामात प्रथमच एवढे पाणी दाखल झाले आहे. त्यामुळेे 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा 1912 दलघफू झाला होता. आज सकाळपर्यंत हा पाणीसाठा 2000 दलघफूच्या पुढे सरकणार आहे. जोरदार पाऊस झाल्याने पाणलोटासह लाभक्षेत्रातील शेतकरी सुखावला आहे.

भंडारदरा धरणात यंदा केवळ 9 टक्के पाणीसाठा होता. अधून मधून पाऊस कोसळत असल्याने धरणात हळुवार पाण्याची आवक होत होती. पण सोमवारी रात्रीपासून पावसाच्या सरी नृत्य करू लागल्याने डोंगरदर्‍यातील धबधबे जोराने वाहु लागले आहेत. ओढे-नाले भरभरून वाहत असून धरणात विसावत असल्याने धरणातील पाणीसाठा वाढु लागला आहे. गत 24 तासांत 329 दलघफू पाणी दाखल झाले. त्यापैकी सध्या पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुरू असून त्यासाठी 136 दलघफू पाणी खर्ची पडले. 193 दलघफू पाणी धरणात जमा झाल्याने काल मंगळवारी सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 1912 दलघफू पर्यंत पोहचला होता.

पाऊस कोसळत असल्याने आज सकाळपर्यंत या धरणातील पाणीसाठा 2000 दलघफूच्या पुढे सरकलेला असेल. भंडारदरात काल मंगळवारी दिवसभरात पडलेल्या पावसाची नोंद 20 मिमी झाली आहे. भंडारदरा धरण आणि वाकी तलाव परिसरात पाऊस कोसळत असल्याने 102 दलघफू क्षमतेच्या वाकी तलावातील पाणीसाठा काल रात्री 60 टक्क्यांच्या (65 दलघफू) पुढे गेला होता. पावसाचा जोर असाच टिकून राहिल्यास हा तलावही लवकर भरण्याची शक्यता असून त्यानंतर निळवंडे धरणात पाण्याची आवक वाढणार आहे.

पिंपळगाव खांड धरण ओव्हरफ्लोच्या मार्गावर

कोतूळ |वार्ताहर| Kotul

अकोले तालुक्यात मुळा नदी पाणलोट क्षेत्रात काल मंगळवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू असल्याने मुळा नदीच्या प्रवाहामध्ये वाढ होत आहे. मुळा नदीचा प्रवाह हा पिंपळगाव खांड मध्ये स्थिरावत असून 600 दलघफू क्षमतेच्या या धरणातील पाणीसाठा 427 दशलक्ष घनफूट झाला आहे. पावसाचा जोर टिकून राहिल्यास हे धरण काही तासांतच ओव्हरफ्लो होण्याची आशा निर्माण झाली आहे. दिवसभराच्या संततधार पावसामुळे आदिवासी भागात डोंगरदर्‍या आता ओल्या चिंब झाल्या आहेत. ओढे नाले खळखळून वाहू लागले आहेत. योग्य पाऊस सुरू झाल्याने भात पिकाच्या लागवडी आता सुरू झाल्या आहेत.

काल मंगळवारी पहाटेपासूनच पाणलोट क्षेत्रात पावसाने जोर धरला. दिवसभर पावसाचे सातत्याने टिकून जोराच्या सरी कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुळा नदीच्या प्रवाहामध्ये वाढ होत आहे. मुळा नदीचा प्रवाह हा पिंपळगाव खांड मध्ये स्थिरावत असून पिंपळगाव खांड धरणाचा पाणीसाठा 427 दशलक्ष घनफूट झाला आहे. धरण ओव्हरफ्लो होण्याची आशा निर्माण झाली आहे. यामुळे धरणातून नदी पात्रात सुरू असलेले पिण्याचे पाण्याचे रोटेशन बंद करण्यात आल्याचे शाखा अभियंता सूर्यवंशी यांनी सांगितले. रात्री उशिरा पिंपळगाव खांड धरण ओव्हरफ्लो होऊन पाण्याचा प्रवाह मुळा धरणाकडे झेपावणार आहे.

दारणा 58 तर भावली धरणात 24 दलघफू नवीन पाणी

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

नाशिकच्या घाटमाथ्यावर अधुनमधून पडणार्‍या जोरदार पावसामुळे काल सकाळी 6 पर्यंत मागील 24 तासांत दारणात 58 दलघफू तर भावलीत 24 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. काल सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील घोटी, इगतपुरी परिसरात सलग नसला तरी अधूनमधून जोरदार पावसाचे आगमन होत आहे. दारणाच्या भिंतीजवळ काल सकाळी 6 वाजेपर्यंत 45 मिमी पावसाची नोंद झाली. भावलीला 100 मिमी पावसाची नोंद झाली. मुकणेला 32, वाकीला 72, भामला 76, वालदेवी 37, गंगापूर 30, कश्यपी 55, गौतमी गोदावरी 20, कडवा 11, आळंदी 11, त्र्यंबक 41, अंबोली 38 , नाशिक 16 , नांदूरमधमेश्वर 5 मिमी असा पाऊस नोंदला गेला.

दारणात काल सकाळी 6 पर्यंत 58 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. धरण परिसरात पावसाचा जोर म्हणावा असा नसला तरी धिम्यागतीनेका होईना धरणात दोन दिवसांपासून आवक सुरु झाली आहे. सोमवारी 3.42 टक्के असलेला या धरणाचा साठा 3.87 टक्के झाला. भावलीचा शुन्य टक्के असलेला साठा 5.58 टक्के इतका झाला आहे. काल सकाळ पर्यंत या प्रकल्पात 24 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. घोटी तसेच इगतपुरी परिसरातही पावसाचे अधूनमधून आगमन होत आहे. मान्सुन तेथे सक्रीय असला तरी पावसात अपेक्षीत जोर नसल्याने पाण्याची आवक कमी होत आहे.

कुकडीत पहिल्यांदाच पाण्याची आवक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दक्षिण नगर जिल्ह्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचे भवितव्या अवलंबून असणार्‍या पुणे जिल्ह्यातील कुकडी प्रकल्प समुह धरणांमध्ये या हंगामात पहिल्यांदाच नवीन पाण्याची आवक झाल्याने पाणलोटातसह नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. गत 24 तासांत कुकडी धरणांमध्ये 85.87 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले आहै. ूत्यामुळे धरणांतील पाणीसाठा 1425.82 दलघफू (4.80 टक्के) पाणीसाठा झाला होता. गतवर्षी या धरणात या काळात 2169 दलघफू पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाणीसाठा आहे. दरम्यान, काल मंगळवारी पाणलोटात अधून मधून पाऊस कोसळत होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या