Saturday, July 27, 2024
Homeनगरभंडारदरा व परिसरात स्वातंत्र्य दिनी पर्यटकांची मोठी गर्दी, रस्ते गर्दीने फुलले

भंडारदरा व परिसरात स्वातंत्र्य दिनी पर्यटकांची मोठी गर्दी, रस्ते गर्दीने फुलले

अकोले |प्रतिनिधी| Akole

रविवारी स्वातंत्र्य दिन (Independence Day) व सोमवारी पारशी नववर्षानिमित्तची सुट्टी जोडून आल्यामुळे निसर्गाचे लेणे समजल्या जाणार्‍या भंडारदरा धरण (Bhandardara Dam) व परिसरात हजारो पर्यटकांनी (Tourists) हजेरी लावली. करोनाचे सावट (Covid 19) असताना देखील मोठ्या प्रमाणात पर्यटक घरा बाहेर पडले व भंडारदरा धरण (Bhandardara Dam) व परिसरात मोठी गर्दी (Crowd) केली होती. या परिसरातील रस्ते गर्दीने ओसंडून वाहत होते.

- Advertisement -

महाराष्ट्रातील सर्वात उंच असणार्‍या कळसूबाई शिखरावरही (The highest peak in Maharashtra is Kalsubai) पर्यटकांची मोठी गर्दी पहावयास मिळाली. गडावर जाण्यासाठी मुंबई (Mumbai), पुणेचे (Pune) पर्यटक आले होते. तसेच रंधा (Randha) परिसरातही गर्दी दिसून आली.

15 ऑगस्टच्या सुट्टीत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी अकोले तालुक्यात (Akole Taluka) पुणे, नाशिक, ठाणे मुंबई आणि नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक दरवर्षी येत असतात. भंडारदरा धरण (Bhandardara Dam), रंधा धबधबा (Randha Falls), कोकणकडा (Kokankada), हरिश्चंद्र गड (Harishchandra Gad), कळसुबाई शिखर (Kalsubai peak), अमृतेश्वर मंदीर रतनवाडी (Amruteshwar Temple Ratanwadi), सांदनदरी या प्रेक्षणीय स्थळी मागील वर्षा प्रमाणे यंदाही करोनाचे सावट असतांना देखील मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. अधून मधून पावसाच्या सरी कोसळत होत्या.

परिसरातील छोटे मोठे धबधब्या खाली पर्यटक चिंब भिजत आनंद लूटत होते. अबाल वृद्धांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. अनेक जणांनी आपल्या मोबाईल मध्ये निसर्ग सौंदर्याचे फोटोसेशन केले.

पावसामुळे परिसरातील अनेक रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झालेले आहेत. या भागातील रस्ते अरुंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता वाहतूक नियमात बदल करण्यात आले होते. साधारण 30-35 पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी या परिसरात तैनात करण्यात आले होते. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजूर पोलिसांनी रंधा फाटा येथून भंडारदरा येथे जाण्यासाठी प्रवेश बंद केला.

शेंडी-भंडारदरा येथे जाण्यासाठी वाकी फाटा, वारंघुशी फाटा येथून प्रवेश ठेवण्यात आला होता. एकेरी वाहतुकीचा मार्ग-वारंघुशी फाटा-वाकी फाटा-चिचोंडी फाटा-यश रिसोर्ट-शेंडी-भंडारदरा धरण स्पिल-वे गेट-भंडारदरा गाव- गुहीरे-रंधा मार्गे इच्छित स्थळी मार्ग केला होता.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार, पोलीस फटांगरे, मोरे, डगळे, आघाडे यांचेसह सर्व पोलीस कर्मचारी विशेष लक्ष ठेऊन होते. पर्यटकांनी करोनाचा प्रादुर्भाव बघता नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असून देखील काही पर्यटक मास्क न घालणे पसंत करताना दिसले तसेच चेक पोस्टवर पर्यटकांची कसून तपासणी करण्यात येत होती. राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी यासंदर्भात सूचना देत पर्यटकांना मद्यपान करणे किंवा मद्य बाळगू नये, असे आवाहन केले होते. तरी सुद्धा काही तरुण हौशी पर्यटकांनी सोबत आणलेल्या बाटल्या तपासणी आधीच रस्त्या लगत फेकून दिल्या तर काही जणांकड़ून दारुच्या बाटल्या पोलिसांनी घेऊन ओतून दिल्याचे चित्र पहावयास मिळाले. चार चाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लगल्याचे चित्र भंडारदरा परिसरात पहावयास मिळाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या