Wednesday, May 29, 2024
Homeनगरनगरचे पाणी जायकवाडीत दाखल, नाशिकचे आज पोहचणार

नगरचे पाणी जायकवाडीत दाखल, नाशिकचे आज पोहचणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर जिल्ह्यातील धरणांमधून मराठवाड्यासाठी पाणी सोडणे सुरू असून काल सोमवारी दुपारी मुळा धरणाचे पाणी जायकवाडी बॅकवॉटरमध्ये पोहचलं आहे तर रात्री भंडारदरा-निळवंडेतील पाणी दाखल झाले होते. आज नाशिकच्या धरणातील पाणी दाखल होणार आहे.

- Advertisement -

मुळा धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. काल दुपारी हे पाणी जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये दाखल झाले.

भंडारदरातून काल 10032 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. काल हा विसगर 8060 क्युसेक करण्यात आला. तर निळवंडेतून 10436 क्युसेकने पाणी जायकवाडीकडे झेपावले. हे पाणीही काल रात्री जायकवाडीच्या बॅकवॉटरमध्ये दाखल झाले. जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने जोरदार पाऊस झाल्याने या पावसाचे पाणीही प्रवरा, मुळा नदीत दाखल झाले आहे.

मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांचे दि.30/10/2023 चे आदेशानुसार समन्यायी पाणी वाटप कायद्यांतर्गत अहमदनगर नाशिक जिल्ह्यातील धरणातुन दि.25/11/2023 रोजी जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास सुरवात झालेली आहे. यादरम्यान दि. 26/11/2023 रोजी अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात सर्वदुर पाऊस झाला असुन पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज आहे. बहुतांश भागात 25 मिमी ते 75 मिमी पर्यंत पाऊस झाल्याने जायकवाडीला पाणी सोडताना नदीत पात्रात गृहीत धरलेल्या 30 ते 32 टक्के वहन व्यय होण्याची शक्यता नाही. उलट पावसाचे पाणी नदीपात्रात आल्याने पाण्यात वाढ होण्याचीच शक्यता आहे. या पार्श्व भूमिवर नगर, नाशिक मधील धरणातुन जायकवाडीसाठी 8.60 टीएमसी पाणी सोडण्याऐवजी 2.60 टीएमसी वहनव्यय वजा जाता 6 टीएमसी पाणी सोडण्यासंदर्भात पूर्वनियोजन होणे आवश्यक वाटते. यासंदर्भात क्षेत्रीय परिस्थितीचा आढावा घेऊन तातडीने कार्यवाही झाली तर वहनव्ययाचे पाणी वाचुन नगर नाशिकसाठी थोडाफार दिलासा मिळू शकेल.

– उत्तमराव निर्मळ सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग

गोदावरीत 15248 क्युसेकने विसर्ग

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

जायकवाडीसाठी नाशिकच्या दारणा तसेच गंगापूर समुहातून 15248 क्युसेकने विसर्ग काल उशीरा पर्यंत सुरु होता. दारणा समुहातील दारणा, कडवा, मुकणे या धरणातून काल सकाळी 6 पर्यंत 696 दलघफू पाण्याचा विसर्ग करण्यात आला. हे पाणी अर्धा टीएमसी हुन अधिक आहे. दारणातून काल सकाळी 6 पर्यंत 439 दलघफू, कडवातून 181 दलघफू, व मुकणेतून 76 दलघफू पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. दारणा धरणातून 7556 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. कडवातुन 3248 क्युसेकने चालु असलेला विसर्ग काल सायकाळी 6 वाजता बंद करण्यात आला. मुकणे धरणातून मात्र 900 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. भाम मधुनही पाणी काढण्यात आले आहे. भाम मधुन 12 दलघफूचा विसर्ग काल सकाळी 6 पर्यंत झाला होता. दारणा समुहातून जायकवाडीसाठी 2.6 टीएमसीचा विसर्ग करण्यात येणार आहे.

गंगापूर समुहातील फक्त गंगापूर धरणातून 2616 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. गंगापूर मधुन फक्त अर्धा टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. 500 दलघफू पाण्यापैकी काल सकाळी 6 पर्यंत 189 दलघफू पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. दरम्यान गंगापूरचा विसर्ग काल सायंकाळी 6.45 वाजता 2616 वरुन कमी करत तो 997 क्युसेकवर आणण्यात आला.

दारणा तसेच गंगापूर धरणसमुहातील धरणांमधुन सोडण्यात येणारा विसर्ग खाली नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात दाखल होत असल्याने या बंधार्‍यातून जायकवाडीला काल 15248 क्युसेकने विसर्ग गोदावरी नदीत सुरु होता. नदीत काल सकाळी 6 पर्यंत 353 दलघफू पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. आता विसर्ग 15248 क्युसेकने सुरु असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी नदीत वाहत आहे.

काल गोदावरीत हे पाणी सायंकाळी 4 वाजता पुणतांबा परिसराचे पुढे निघाले होते. ते काल रात्री 7 वाजता ते नाउरच्या पुढे निघाले होते. ते आज जायकवाडीचे बॅक वॉटर असलेले प्रवरासंगम येथे पोहचेल असा अंदाज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या