भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara
उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात जोरदार पाण्याची आवक सुरू असल्याने 89 टक्के पाणीसाठा स्थिर ठेऊन अखेर काल दुपारी 3.30 वाजेपासून प्रवरा नदीत पाणी सोडण्यास सुरूवात झाली आहे. पाणलोटातील चेरापुंजी समजल्या जाणार्या घाटघर आणि रतनवाडीत आषाढसरींनी धुडगूस घातल्याने डोंगरदर्यांवरील धबधबे आक्राळविक्राळ रूप धारण करीत असून पाण्याच्या लोंढे धरणात विसावत आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी सातत्याने वाढत आहे.
काल सकाळी संपलेल्या 24 तासांत धरणात नव्याने तब्बल 1095 दलघफू पाणी दाखल झाले. त्यानंतरही पाण्याची आवक वेगाने होत असल्याने नियमानुसार धरणातील पाणी पातळी स्थिर ठेऊन काल सकाळी विद्युत गृहातून 830 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता धरणातून 1000 क्युसेकने प्रवरा नदीत पाणी सोडण्यास सुरूवात झाली. त्यामुळे आता एकूण 1846 क्युसेकने प्रवरा नदीत पाणी सोडण्यात येत होते.
त्यानंतर सायंकाळी 6.45 वाजता स्पिलवेतून 3442 क्युसेक तर विद्युत गृहातून 830 क्युसेक असे एकूण 4272 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. पाऊस वाढल्यास हा विसर्ग आणखी वाढविण्यात येणार आहे.
डोंगररांगा, रस्ते धुक्याने दाटून गेले असून जिकडे पहावे तिकडे पाणीच पाणी दिसत आहे. दरम्यान, भंडारदरातून सोडण्यात येणारे 4272 क्युसेक पाणी तसेच वाकी तलावातून सुरू असलेला 4046 क्युसेकचा विसर्ग तसेच अन्य पाणी पाहता 9 -10 हजार क्युसेक पाणी निळवंडे धरणात जमा होत असल्याने आता या धरणातील पाणीसाठाही तासागणिक वाढू लागला आहे. 8330 दलघफू क्षमतेच्या निळवंडेत काल सायंकाळी पाणीसाठा 3922 दलघफू (47.06 टक्के) होता. तो काही वेळातच 50 टक्क्यांवर गेला.
पाण्याची आवक वाढल्याने रात्री 8.30 वाजता साठा 9948 दलघफू (90.21टक्के) स्थिर ठेऊन स्पीलवेतून 7122 क्युसेकने तर विद्युत गृहातून 830 असा एकूण 7972 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. आज या धरणातील पाणीसाठा 60 टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, 1060 दलघफू क्षमतेचे आढळा धरणही काल दुपारी ओव्हरफ्लो झाले. आढळा खोर्यातही पाऊस सुरू असल्याने पाण्याची आवक होत असल्याने या धरणातून 1813 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते.
धो-धो पावसामुळे प्रचंड नुकसान
पाणलोटात धो-धो पाऊस कोसळत असल्याने भंडारदरा पाणलोटात प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्या आहेत. काही ठिकाणी विजांचे खांब पडले. तारा तुटल्या. तसेच काही ठिकाणी वादळी पावसामुळे घरांचे कौले उडून गेली. या भागातील जनजीवन गारठून गेल्याने जनावरांचेही हाल होत आहेत. काही ठिकाणी बांध तुटल्याने भाताची रोपे वाहुन गेली आहेत.
पर्यटन क्षेत्र पूर्णपणे बंद
पाणलोटात धो-धो पाऊस आणि जोरदार वारे वाहत असल्याने खबरदारीचा उपाय तसेच काही अनर्थ घडू नये यासाठी भंडारदरा परिसरातील पर्यटन क्षेत्र पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.
गोदावरीला पूर
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने धरणांचे विसर्ग वाढल्याने नांदूर मधमेश्वर बंधार्यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत काल 55778 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. त्यामुळे गोदावरीला पूर आला आहे. पाण्याची आवक पाहता विसर्गात रात्रीतून वाढ होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने गोदावरीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यात बुधवारी दिवसभर आणि उशिरा मुसळधार पाऊस झाला. सह्याद्रीचा घाटमाथा पावसाने झोडपून काढला. काल सकाळी 6 वाजता संपलेल्या मागील 24 तासांत दारणा धरणाच्या पाणलोटातील इगतपुरीला 240 मिमी पावसाची नोंद झाली.
घोटीला 172 मिमी, धरणाच्या भिंतीजवळ 75 मिमी पावसाची नोंद झाली. तसेच 100 टक्के भरलेल्या भावली धरणाच्या भिंतीजवळ 220 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे भावलीच्या सांडव्यावरुन सकाळी 2865 क्युसेकने विसर्ग दारणा धरणाकडे झेपावत होता. तसेच दारणाच्या पाणलोटातील मुसळधार यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत होती. 86 टक्के पाणीसाठा स्थिर ठेवून दारणा धरणाच्या सहा वक्राकार दरवाजातून विसर्ग सुरू आहे. सकाळी 1100 क्युसेकने सुरू असलेला विसर्ग काल सायंकाळी टप्प्याटप्प्याने वाढवत तो 15498 क्युसेकपर्यंत नेण्यात आला. काल दिवसभर दारणा धरणाच्या पाणलोटात मुसळधार पाऊस बरसत होता. घोटी, इगतपुरी परिसरात मुसळधार सुरू होती. त्यामुळे दारणा धरणाच्या दिशेने वाहत येणारे छोट्या मोठ्या नद्या, ओढे नाले तुडूंब भरून वाहत होते. काल सकाळी 6 ते सायंकाळी 6 या 12 तासांत दारणाच्या भिंतीजवळ 74 मिमी, भावलीला 124 मिमी, भाम ला 121 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे भाम प्रकल्पही ओव्हरफ्लो झाला आहे. त्याच्या सांडव्यावरुन पाणी ओसंडून वाहत आहे.
गंगापूर धरणाच्या पाणलोटातही पावसाने दीड दिवसापासून जोरदार हजेरी लावली. काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासांत गंगापूरच्या भिंतीजवळ 105 मिमी पावसाची नोंद झाली. काल दिवसभरातील 12 तासांत 111 मिमी पावसाची नोंद झाली. गंगापूरच्या पाणलोटातील त्र्यंबकला 73 मिमी, आंबोलीला 90 मिमी 12 तासात नोंद झाली. कश्यपिला 40 मिमी, गौतमीला 61 मिमी पावसाची नोंद झाली. गंगापूर धरण समूहातील गौतमी गोदावरी धरणातूनही विसर्ग सुरू आहे. हे पाणी गंगापूर मध्ये सामावत आहे. त्यामुळे काल 13000 क्युसेक नवीन पाणी गंगापूर मध्ये दाखल होत होते. 91 टक्के पाणी साठा स्थिर ठेवून या धरणातून विसर्ग करण्यात येत होता. काल सकाळी 11 वाजता गंगापूर मधून 7413 क्युसेकने विसर्ग सुरू होता. तो टप्प्याटप्प्याने वाढवत 13932 क्यूसेक इतका करण्यात आला. त्यामुळे नाशिक शहरातून मधून वाहणार्या गोदावरीला पूर आला आहे.
गंगापूर मधून 13932, पालखेड मधून 6610, कडवा मधून 10965, पुणेगाव मधून 8201, दारणा मधून 25498, वालदेवीतून 2175 क्युसेकने विसर्ग नांदूर मधमेश्वर बंधार्याच्या दिशेने येत असल्याने या बंधार्याचे 8 वक्राकार दरवाजे पूर्णक्षमतेने उघडण्यात आले आहे. सकाळी 3155 क्युसेकने सुरू असलेला विसर्ग काल दिवसभरात वाढवत सायंकाळी 6.30 वाजता 55778 क्यूसेक इतका करण्यात आला. वरील धरणातील तसेच मधमेश्वर च्या पाणलोटात पावसाचे प्रमाण आणखी वाढल्यास गोदावरीत सोडण्यात येणारा विसर्ग वाढू शकतो. दरम्यान गोदावरीतून जायकवाडीच्या दिशेने गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. हे पाणी पोहोचण्यापूर्वी रात्री 8 वाजता गोदावरी वरील नागमठाण येथील सरिता मापन केंद्राजवळ 4400 क्यूसेकने आवक होत होती. रात्रीतून जास्तीचा विसर्ग दाखल होणार आहे. रात्री पाणी दाखल होण्यापूर्वी जायकवाडीत उपयुक्त साठा 31.07 टक्के इतका होता.




