भंडारदरा (वार्ताहर)
भंडारदरा पाणलोटक्षेत्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. ११०३९ दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणाचा पाणीसाठा शुक्रवारी सायंकाळी ७५६२ दलघफू (६८.५०टक्के) तर निळवंडेचा ४८६८ दलघफू (५८.४५ टक्के) झाला आहे. पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी भंडारदरा धरणातून ३९४९ क्युसेकने प्रवरा नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे.
गेली चार-पाच दिवस पावसाचे चांगलीच हजेरी लावल्याने धरणांत मोठ्या प्रमाणात नवीन पाणी जमा झाल्याने पाणीपातळी दिवसागणीक वाढत गेली. त्यामुळे यंदा धरण जुलै महिन्यातच ओसंडण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासांत (शुक्रवारी सकाळी ६ वाजेपर्यंत) भंडारदरा धरणात ३८७ दलघफू तर निळवंडेत २८१ दलघफू नवीन पाणी जमा झाले आहे. अजूनही पावसाच्या रिमझिम सरी कोसळत असल्याने नवीन पाणी धरणाच्या पोटात विसावत आहे. दरम्यान, प्रवरा नदी वाहती झाल्याने लाभक्षेत्रात आनंदाला उधाण आले आहे.
राहुरी (प्रतिनिधी) : मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणात कोतूळकडून येणारी पाण्याची आवकही काही प्रमाणात घटली आहे. मुळा धरणाचा पाणीसाठा जवळपास ५६.५५ टक्क्यावर पोहचला आहे.
मुळा धरणात गुरूवारी संध्याकाळी १२ हजार ४१ क्युसेस आवक सुरू होती. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत चांगली वाढ झाली. मात्र, गुरुवारी रात्री पावसाचा जोर कमी झाल्याने काल सकाळी आवक ५ हजार ३२७ क्युसेसवर आली. पाणीसाठा १४ हजार ४७१ दलघफू झाला होता. परंतू काल पाणलोट क्षेत्रातील घाटमाथ्यावर पावसाने पुन्हा ठेका धरल्याने आवक सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ती ८ हजार २८ क्युसेस झाली. पाणीसाठा १४ हजार ७०४ दलघफू झाला आहे. तर धरणात गेल्या २४ तासात ६१४ दलघफू व आतापर्यंत एकूण ५ हजार ७९८ दलघफू नवीन पाण्याची आवक झाली आहे.




