भंडारदरा, कोतुळ । वार्ताहर
भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील चेरापुंजी समजल्या जाणार्या घाटघर आणि रतनवाडीत काल सकाळी 24 तासात दहा इंच पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणात येत असलेल्या नवीन पाण्याची आवक विचारात घेवून धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यात वाढ करण्यात आली. सकाळी 6 वाजता एकुण 12119 क्युसेक पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात येत होते. त्यामुळे निळवंडेच्या पाण्यासाठ्यातही झपाट्याने वाढ होत आहे.
11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल शुक्रवारी 9275 दलघफू ( 84.02 टक्के) नियंत्रित ठेवून 12119 क्युसेकने प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत होते. काल सायंकाळी विसर्ग कमी करून तो 9907 क्युसेक करण्यात आला होता. हा विसर्ग आणि कृष्णवंती व अन्य ओढे-नाल्यांचे पाणी निळवंडेत जमा होत असल्याने या धरणातील पाणीसाठा काल सायंकाळी 6 वाजता 5378 दलघफू (65 टक्के) झाला आहे.
मुळा पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कालही टिकून राहिला. हरिश्चंद्रगड, आंबीत, कुमशेत, जानेवाडी परिसरात पावसाची बॅटिंग सुरूच असल्याने परिसरातील ओढे, नाले खळखळून वाहत आहेत. यामुळे मुळा धरणाकडे पाण्याची चांगली आवक सुरू आहे. कोतुळ येथून काल सायंकाळी 6 वा. 7410 क्युसेकची आवक सुरू होती. 26 टीएमसी क्षमतेच्या मुळा धरणाचा पाणी साठा 60 टक्के झाला आहे. सायंकाळी धरणाचा पाणीसाठा 15897 दलघफु झाला असल्याची माहिती मुळा पाटबंधारेचे शाखा अभियंता राजेंद्र पारखे यांनी दिली.
गत 24 तासात पडलेला पाऊस मिली मिटरमध्ये पुढीलप्रमाणे : भंडारदरा165 मिमी, घाटघर 256 मिमी, पांजरे 199 मिमी, रतनवाडी 245 मिमी, वाकी 129 मिमी
भंडारदऱ्याचे निसर्ग सौंदर्य फुलले असून पर्यटकांना मोहून टाकत आहे. जणू काही हिरवा शालूच परिधान केला आहे. परिसरातील बहुतेक शेतकरी आवणीच्या कामात असल्याचा परिणाम आठवडे बाजारावरही झालेला दिसून आला. पावसामुळे जनजीवना बरोबर पशुधनही गारठले आहे. लोक धुनीचा आधार घेत आहेत. तर विद्यार्थ्यांचेही हाल होत आहेत. पाणलोटातील पावसाच्या तांडवामुळे भंडारदरा परिसरातील ओढे-नाले तुडुंब भरुन वाहत आहेत, तर धबधब्यांनी आक्राळ-विक्राळ रुप धारण केले आहे. परिणामी निर्गसौंदर्यात अधिक भर पडली आहे.