संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
ऐन उन्हाळ्यात भंडारदरा आणि निळवंडे लाभक्षेत्रात पाण्याचे आवर्तन सुरू झाल्याने शेतकर्यांसह नदीकाठच्या गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आवर्तनाच्या केलेल्या नियोजनाचा मोठा फायदा उत्तर भागाला झाला आहे.
यंदा उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढल्याने लाभक्षेत्रातील काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती. अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. शेतीच्या तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला होता. या सर्व पार्श्वभूमीवर जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाच्या अधिकार्यांची बैठक घेवून दोन्ही धरणांत असलेला पाणीसाठा विचारात घेवून आवर्तन सोडण्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले. धरणांत पाणी असतानाही लाभक्षेत्राला पाण्याची समस्या भेडसावणे उचित नाही ही संवेदनशीलता त्यांनी आपल्या निर्णयातून दाखवून दिली.
आवर्तनाच्या बाबतीत काहींनी राजकीय भाष्य करून शेतकर्यांना पाणी मिळू दिले जात नसल्याचे आरोप सुरू केले होते. मात्र पाण्याच्या बाबतीत कोणताही राजकीय अभिनिवेश मनात न आणता ना. विखे पाटील यांनी ठरलेल्या नियोजनापूर्वीच निळवंडे आणि भंडारदारा धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याच्या निर्णयाचे लाभक्षेत्रातील शेतकर्यांनी स्वागत करून समाधान व्यक्त केले आहे. जलसंपदा विभागाच्या प्रत्येक बैठकीत ना. विखे पाटील यांनी जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकर्याला पाणी मिळेल, असे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. निळवंडे उच्च कालव्यातून यंदा शेतकर्यांना पाणी मिळू शकले याचाही आनंद लाभक्षेत्रातील शेतकर्यांना मिळाला.
यासंदर्भात ना. विखे पाटील यांनी अकोले तालुक्यातील शेतकर्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी संगमनेरात विशेष बैठकीचे आयोजन केले होते. उत्तर भागाला आवर्तनाच्या योग्य नियोजनाचा मोठा दिलासा मिळाला असून ऐन तापलेल्या उन्हाळ्यात भंडारदरा आणि निळवंडे धरणातून पाणी सोडण्याच्या निर्णयामुळे शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच दक्षिण भागातील तालुक्यांना कुकडी, मुळा धरणातून सोडण्यात आलेल्या आवर्तनाचा लाभ मिळाला आहे.