भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara
उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा पाणलोटात काल रविवारीही मान्सूनपूर्व पावसाने जोरदार पाऊस कोसळला. दुपारी 2 वाजता सुरू झालेल्या या पावसाचा जोर सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत सुरू होता. हा पाऊस रात्री उशीरापर्यंत सुरू होता. त्यामुळे धरणात नव्याने पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. गत आठ-दहा दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने मुक्काम ठोकला आहे. कालही दुपारी पाऊस जोरदारपणे बरसल्याने डोंगर-दर्यांमधील अधूनमधून धबधबे जोराने वाहत होते. तर ओढे नाले खळखळत होते. या पावसामुळे भंडारदरा पाणलोट चिंब होऊन गेला आहे.
11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरात काल सायंकाळी 3072 दलघफू पाणीसाठा होता. धरणातून 780 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. 8028 दलघफू क्षमतेच्या निळवंडेत 2138 दलघफू पाणीसाठा होता. या धरणातून 500 क्युसेकने कॅनालसाठी पाणी सोडण्यात येत आहे. 102 दलघफू क्षमतेच्या वाकी तलावात 54.72 दलघफू पाणीसाठा आहे. 1060 दलघफू क्षमतेच्या आढळा धरणात 494 दलघफू पाणीसाठा आहे.
आंबित तलावात निम्मा पाणीसाठा
कोतूळ |वार्ताहर| Kotul
गेल्या काही दिवसांपासून अकोले तालुक्यातील घाटमाथ्यावर मोसमीपूर्व पाऊस सुरू असल्याने डोंगर-दर्या ओलेचिंब झाले आहे. घाटमाथ्यावरील ओढे-नाले वाहते झाले आहे. 198 दलघफू क्षमतेचा आंबित बंधारा निम्मा झाला आहे. पावसाचा जोर वाढल्यास हा बंधारा येत्या काही दिवसांत ओव्हरफ्लो होऊ शकतो. त्यानंतर मुळा नदी वाहती होईल. हरिश्चंद्रगड परिसराचे मोठे पाणलोट क्षेत्र मुळा नदीला लाभले आहे.
या भागात काल रविवारीही मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. आंबित तलावात पाण्याची आवक वाढली आहे. हा तलाव भरण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्य बंधार्यांचे ढापे काढण्यात आले आहेत. कोतूळ परिसरातही दिवसभर रिमझीम सुरू होती. त्यानंतर दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास सरी जोरदार कोसळल्या. काही काळानंतर पुन्हा रिपरिप सुरू होती.
कुकडी समूह धरणांमध्येही पाण्याची धिमी आवक
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
दक्षिण नगर जिल्ह्याला लाभदायी ठरलेल्या कुकडी समूह धरणाच्या पाणलोटातही मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने आता, डिंभे, येडगाव, माणिकडोह, वडज आणि पिंपळगाव जोगा या पाच धरणांमध्ये धिम्या गतीने नवीन पाण्याची आवक होत आहे. या प्रकल्पात मागील वर्षी 1714 दलघफू पाणीसाठा आहे. यंदा 2156 दलघफू पाणीसाठा आहे. मान्सूनपूर्व पाऊस सुरू असल्याने या प्रकल्पात नव्याने 122 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले आहे.
आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण तसेच जुन्नर तालुक्यातील येडगाव, माणिकडोह, वडज आणि पिंपळगाव जोगा या पाच धरणांचा मिळून कुकडी प्रकल्प तयार झाला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत तसेच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा अशा एकूण सात तालुक्यातील सुमारे 1 लाख 56 हजार 278 हेक्टर एवढे क्षेत्र कालव्याद्वारे सिंचनाखाली आले आहे. कुकडी प्रकल्पावर या भागातील सर्व सिंचन प्रकल्प आणि पाणी योजना अवलंबून आहेत.