भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara
उत्तर नगर जिल्ह्याची जिवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरण परिसरा आणि पाणलोटातील काही भागात काल सलग दुसर्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे या भागात मान्सून सक्रिय झाल्याचे संकेत मिळत आहेत. एरव्ही जूनमध्ये भंडारदरा पाणलोटात जोरदार पाऊस बरसत असतो. पण यंदा जून संपत आला तरी पावसाचे आगमन झाले नव्हते. त्यामुळे पाणलोट आणि लाभक्षेत्रात चिंतेचे वातावरण होते. पण शनिवारी या भागातील नूर बदलला. आकाशात काळे ढग जमा झाले आणि सायंकाळी पावसास सुरूवात झाली. त्यानंतर पावसाचा जोर वाढला. सुमारे तासभर पाऊस कोसळत होता.
रविवारीही सायंकाळी पावसास सुरूवात झाली. साडे पाच वाजण्याच्या सुमारास झालेला पाऊस तासभर कोसळत होता.
सलग दोन दिवस पाऊस पडत असल्याने उन्हाने होरपळणार्या शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला आहे. तसेच पाऊस प्रथमच पडता झाल्याने पाणलोटातील शेतकरी आनंदला आहे.
काल सकाळी नोंदविल्या गेल्यानुसार भंडारदरात 9, घाटघर, पांजरे प्रत्येकी 8, रतनवाडीत 11 आणि वाकीत 9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धणात काल सायंकाळी 2359 दलघफू (21.37 टक्के) पाणीसाठा होता. तर निळवंडेत 1562 (18.74 टक्के) पाणीसाठा होता.
मुळा पाणलोटात पावसाळी वातावरण
कोतूळ वार्ताहराने कळविले की, मुळा धरणाच्या पाणलोटातील अकोले तालुक्यातील हरिश्चंद्र गड, पाचनई, कोतूळ भागात गत दोन दिवसांपासून पावसाळी वातावरण आहे. पण जोराचा पाऊस झाल्याचे वृत्त नाही.




